जरे हत्याकांड.. पोलिसांकडून अन्य कारवाईचा विचार सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे सापडत नसल्याने त्याच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार अन्य काही कारवाई करता येईल काय, याचा विचार पोलिसांनी सुरू केला आहे. अर्थात पोलिसांकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले जात नाही. पण शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने त्याच्याविषयी मिळत असलेली माहिती चुकीची मिळते काय, तसेच त्याच्याविरुद्ध अन्य कोणती कायदेशीर कारवाई करता येईल व तिचा काही उपयोग होईल काय, यादृष्टीने पोलिसांनी विचार सुरू केला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही अन्य कारवाई काय असेल, हे मात्र गुलदस्त्यात असून, प्रत्यक्ष कारवाईनंतरच ते स्पष्ट होण्याची शक्यताही यातून दिसू लागली आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा पोलिसांना अद्यापपर्यंत छडा लागलेला नाही. दुसरीकडे आता पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अंतर्गत तयारी सुद्धा सुरू केली आहे. पोलिसांनी केलेल्या बोठेविषयी माहिती देण्याच्या आवाहनास मिळालेल्या प्रतिसादानुसार काही जणांनी माहिती दिली आहे व अजूनही काहीजण माहिती देत आहेत. पण त्या माहितीच्या आधारे शोध घेतला गेल्यावर आरोपी सापडत नसल्याचा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे माहिती देणारांकडून दिशाभूल होते काय, याचीही शंका व्यक्त होऊ लागली आहे. जरे हत्याकांडाला वीस दिवस उलटून गेले तरीही मुख्य आरोपीचा शोध लागायला तयार नाही. आतापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार बोठे याच्या घराची दोनवेळा झडती घेतली होती, अनेक वस्तू या ठिकाणी आढळून आलेल्या होत्या, त्यादृष्टीने त्याचाही तपास सुरू झालेला आहे. त्यातच त्याचा एक फोन सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे, त्यासंदर्भात सुद्धा आता तपास सुरू केला आहे. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्याकडून उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी तयारी सुरू होऊ शकते, त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये हा जामीन अर्ज दाखल होतो का, हे पाहावे लागणार आहे. आरोपीचा शोध न लागल्यामुळे आता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इतर कारवाई काय करता येईल काय, या दृष्टिकोनातून आता पावले उचललेली आहेत. त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पोलिसांचा तपास चालू आहे, अद्यापपर्यंत पसार आरोपीचा शोध लागलेला नाही. मात्र, काही निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत, पण आताच त्याबाबतची माहिती देता येणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर बोठेचा शोध एकीकडे पोलिसांनी सुरू ठेवला असताना दुसरीकडे त्याच्याविरुद्ध आणखी काय कारवाई सुरू करता येईल, याचाही विचार सुरू असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post