पालकमंत्री येण्याआधी 'ते' हत्यारे शोधण्याचे आव्हान; जरे यांच्या खुनामुळे सामाजिक कामातील महिला अस्वस्थ

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेड या नगरमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सामाजिक संघटनेच्या नेत्या व महिलांच्या प्रश्नांसह सामाजिक प्रश्नांची आक्रमकपणे तड लावणाऱ्या रेखा जरे यांची हत्या करणारांना दोन दिवसात जेरबंद करण्याचे आव्हान जिल्हा पोलिसांसमोर आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ येत्या ३ डिसेंबरला नगरला येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याआधी जरे यांच्या खुनातील आरोपी जेरबंद करण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. दरम्यान, नगरमध्ये स्वयंसेवी संस्था, विविध जातींच्या संस्था व राजकीय पक्ष-संघटनांच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या महिलांमध्ये जरे यांच्या खुनामुळे अस्वस्थता पसरली आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या प्रमुख रेखा जरे यांची सोमवारी रात्री ८च्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात गळ्यावर चाकूने वार करून हत्या झाली आहे. त्या पुण्याहून नगरकडे येत असताना मोटारसायकलवरील दोघांनी त्यांच्या गाडीला कट मारला व त्यातून झालेल्या वादातून त्यांनी त्यांची हत्या केल्याचे सांगितले जाते. या घटनेने नगरमध्ये खळबळ उडाली आहे. विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतील सक्रिय सहभागातून जरे नगरमध्ये प्रसिद्ध होत्या. महिलांचे कौटुंबिक प्रश्न, त्यांची फसवणूक, आर्थिक शोषण, अपप्रवृत्तींकडून महिलांना होणाऱ्या त्रासाचे प्रश्न सोडवण्यात त्या अग्रेसर असायच्या तसेच महापालिका व जिल्हा प्रशासनातील गैरप्रकारांविरुद्धही त्यांनी आवाज उठवले आहेत. त्यामुळे त्यांच्या खुनाची घटना नगरमध्ये खळबळ उडवून गेली. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभर याच विषयावर सोशल मिडियातून चर्चा सुरू होती. अशा स्थितीत जरे यांचे मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी ६ पथके केली असून, एका संशयित आरोपीचे छायाचित्रही सगळीकडे पाठवून त्याची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या खुनाचे काही धागेदोरे त्यांच्या हाती लागल्याचे सांगितले जाते. तीन क्ल्यू पोलिसांना मिळाले आहेत, पण जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत, तोपर्यंत पोलिस अधिकृतपणे यावर काहीही भाष्य करीत नाहीत. सार्वजनिक जीवनात रेखा जरे यांच्या समवेत काम करणाऱ्या सदस्या, तसेच जरे यांचा विविध कारणाने समाजातील विविध घटकांशी असलेला संपर्क तसेच त्या राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्य असल्याने त्या पक्षात त्यांच्यासमवेत काम करणारांशी संवाद साधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. पोलिसांना जरे यांचा खून सुपारी देऊन झाला की, रस्त्यावर गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झाला, याचा उलगडा तपासातून होणार आहे. त्यामुळे या दोन्ही दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पालकमंत्र्यांना द्यावे लागणार उत्तर
नगरमधील बनावट डिझेल प्रकरण तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक व पोलिस कर्मचाऱ्याची व्हायरल झालेली क्लीप, रोज होणाऱ्या घरफोड्या व आता रेखा जरे यांच्यासारख्या सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या महिलेच्या निर्घृण खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे काय, याचे उत्तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना गुरुवारी (३ डिसेंबर) नगर दौऱ्यात पत्रकारांना द्यावे लागणार आहे. या दिवशी दुपारी १ वाजता त्यांची पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. त्यावेळेपर्यंत जरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते विविध बैठका या दिवशी नगरमध्ये होणार आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या ग्रामसेवक कुटूंबियांना विमा कवच अंतर्गत 50 लाख रुपये मदतीच्या धनादेशांचे वाटप होणार असून, त्यानंतर कोरोना सद्यस्थिती व दुसरी लाटबाबत आढावा बैठक आणि अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना देण्यात येणा-या शासकीय मदतीबाबत आढावा बैठकही होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post