पर्यटकांचे झाले गुलाब फुलांनी स्वागत.. नगरच्या साईबनमध्ये रंगू लागल्या हुरडा पार्ट्या

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मागील ८-९ महिन्यांपासून बंद असलेले पर्यटन आता शासनाने खुले केले असल्याने नगरच्या नागापूर एमआयडीसी परिसरात असलेल्या साईबन पर्यटन स्थळी पर्यटकांचे गुलाबाची फुले देऊन स्वागत करण्यात आले. येथे आता बोटींग, बैलगाडी सफारी, पपेट शो अशा उपक्रमांसह हुरडा पार्ट्याही सुरू झाल्या आहेत.

नगरच्या साईबन येथे हुरडा पार्टी व पर्यटनाची सुरवात गुंडेगावचे ज्येष्ठ समाजसेवक राजाभाऊ भापकर गुरुजी यांच्या हस्ते झाली. साईबन हे हिरवाईचे नंदनवन असून डॉ. प्रकाश व डॉ. सुधाताई कांकरिया यांनी माळरानावर हिरवाई फुलवण्याचे केलेले कार्य प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन भापकर गुरुजी यांनी यावेळी केले. त्यांच्या हस्ते श्रीसाईबाबा प्रतिमेची पूजा केली गेली व बालगोपाळ पर्यटकांचे गुलाबाच्या फुलांनी स्वागत झाले, त्यानंतर हुरडा भट्टीची विधिवत पूजा झाली. यावेळी दशरथ जावळे गुरुजी, निसर्ग पक्षी मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराम सातपुते, वनस्पती अभ्यासक अमित गायकवाड, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय महामंत्री सतीश लोढा, महावीर इंटरनॅशनल संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना, साईबनचे संचालक डॉ. प्रकाश व डॉ. ससुधाताई कांकरिया उपस्थित होते.

भापकर गुरुजी पुढे म्हणाले, डॉक्टरकीचा पेशा सांभाळून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून सुमारे ८० एकरात माळरानावर हजारो वृक्ष फुलवून एक चांगला आदर्श डॉ. कांकरिया दाम्पत्यांनी समाजासमोर आणला आहे. पर्यावरण रक्षणाचे मोलाचे कार्य केले आहे, असे ते म्हणाले. वृक्षराजीमुळे मनःशान्ती मिळते व विचारातदेखील सकारात्मक बदल होतात, हा माझा अनुभव आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, साईबनमध्ये फिरण्यासाठी वा हुरडा पार्टीसाठी येणाऱ्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन डॉ. कांकरिया यांनी केले. साईबनमध्ये पर्यटक व हुरडा पार्टीसाठी वेळ सकाळी १० ते दुपारी ४ अशी ठेवण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post