शिर्डीत आता 'ड्रेस-कोड' संघर्ष रंगणार; देसाईंनी बंदी धु़डकावली.. काळे फासण्याचा सेनेचा इशारा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शिर्डीच्या साईसमाधी मंदिरात दर गुरुवारी भाविकांची दर्शनासाठी आवर्जून हजेरी असते. पण आताच्या गुरुवारी (१० डिसेंबर) मंदिरात एकीकडे भाविकांची मांदियाळी जमणार आहे तर बाहेर रस्त्यावर ड्रेस-कोड समर्थन व विरोध आंदोलन रंगणार आहे.

साई संस्थानने मध्यंतरी आवाहन करणारा फलक मंदिराजवळ लावला आहे व त्यात, या पवित्र स्थळी येत असल्याने भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याचे आवाहन भाविकांना केले आहे. त्याला तृप्ती देसाई यांनी विरोध केला असून, १० रोजी या ड्रेस-कोड विरोधात शिर्डीत आंदोलनाचा इशारा दिला आहे तर त्यांच्या या पवित्र्याला शिवसेनेसह विविध संघटनांनी विरोध केला आहे. देसाई शिर्डीत आल्या तर त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला गेला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी शिर्डीत येण्यास बंदी असल्याची बजावलेली नोटीस धुडकावून १० रोजी शिर्डीत येणारच अशी भूमिका देसाईंनी घेतली आहे. त्यामुळे १० रोजी शिर्डीच्या मंदिराबाहेर रस्त्यावर आंदोलन संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 ते 11 डिसेंबर बंदी घालण्यात आली असून, उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी याबाबतची नोटीस देसाई यांच्या पुणे येथील घरी बजावली आहे. देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीला येऊन शिर्डी संस्थानच्या आवारातील तो आवाहन फलक काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन जर देसाई या शिर्डीमध्ये आल्या तर त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post