खेळ मांडला.. नगर अर्बन निवडणूक चर्चेची सोशल मिडियात धूम


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रिझर्व्ह बँकेने दीड वर्षांपूर्वी प्रशासक राज बसवलेल्या येथील नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीचा खेळ एकतर्फीच सोशल मिडियातून रंगू लागला आहे. मागील ८ डिसेंबरला नगरमधील काही सभासदांनी बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना भेटून बँकेची निवडणूक घेण्याची मागणी केल्यानंतर आता बँकेच्या जिल्हाभरातील शाखांच्या ठिकाणीही सभासदांकडून निवेदने देऊन बँकेची निवडणूक घेण्याची मागणी होत आहे व त्या बातम्या सोशल मिडियातून झळकत आहेत. या मागणीबाबत केंद्रीय सहकार निबंधकांनाही पत्र पाठवल्याचे सांगितले जात असले तरी ज्या रिझर्व्ह बँकेने प्रशासक बसवला, त्या रिझर्व्ह बँकेने प्रशासक हटवला तरच बँकेची निवडणूक होणार असल्याचे माहीत असतानाही रिझर्व्ह बँकेकडे मात्र अशी मागणी स्वतंत्रपणे होत नाही. दुसरीकडे नगर अर्बन बचाव कृती समितीद्वारे बँकेचा एनपीए ६० टक्के झाला असताना बँकेची निवडणूक होऊ शकत नाही, असा दावा केला जात आहे. पण निवडणूक चर्चा घडवून खेळ मांडला जात असल्याचे दिसू लागले आहे. प्रशासक कारकीर्दीत बँकेची पुरेशी वसुली झालेली नाही तसेच गैरव्यवहार प्रकरणी गुन्हेही दाखल करण्याची टाळाटाळ होत आहे. अशा स्थितीत या चर्चेला छेद देण्यासाठी तर बँक निवडणुकीची हाळी उठवली जात नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र, कधी गैरव्यवहारामुळे तर कधी निवडणुकीच्या मागणीमुळे नगर अर्बन बँक मात्र चर्चेत राहात आहे.

११० वर्षांची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेवर १ ऑगस्ट २०१८ रोजी सुभाषचंद्र मिश्रा यांची रिझर्व्ह बँकेने प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावेळी खासदार असलेले भाजपचे दिलीप गांधी बँकेचे अध्यक्ष होते व त्यांच्यासह त्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर बँकेला चुकीच्या कर्जवाटपाबद्दल ४० लाखाचा दंडही रिझर्व्ह बँकेने केला. तसेच नुकताच अडीच कोटी कर्जाच्या संशयास्पद नोंदी स्पष्ट होऊन याबाबत गुन्हा दाखल करण्यास येण्याची सूचना कोतवाली पोलिसांनी बँकेच्या प्रशासकांना पत्र पाठवून केली आहे. अशी सगळी एकीकडे स्थिती असताना दुसरीकडे काही सभासदांकडून बँकेची निवडणूक घेण्याची मागणी जोरदारपणे होत आहे. यात बहुतांश बरखास्त संचालक मंडळाचे समर्थक असल्याचे सांगितले जाते. बँकेचे कर्जवितरण बंद आहे व वसुलीही नाही त्यामुळे सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी सभासद नियुक्त संचालक मंडळ बँकेवर गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बँकेच्या सर्व शाखांच्या कार्यक्षेत्रातील सभासदांकडूनही अशी मागणी टप्प्या टप्प्याने होत असल्याने हा नेमका काय खेळ चाललाय, याचीच जोरदार चर्चा सभासदांमध्ये आहे. रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीच्या निर्णय़ाचा उद्देश साध्य झालाय की काय, अशी शंका यानिमित्ताने सभासदांतून व्यक्त होत आहे. त्यामुळेच आता निवडणूक मागणीच्या या अर्जांची केंद्रीय सहकार निबंधक व रिझर्व्ह बँक काय दखल घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, तोपर्यंत बँक निवडणूक मागणीची चर्चा रंगत राहणार आहे.

विरोधकांकडून टीका

बँकेच्या निवडणूक मागणीवर नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने आक्षेप घेतला आहे. गेली तीन वर्षापासून सभासदांना लाभांश नाही व आणखी किती वर्ष मिळणार नाही हे सांगता येत नाही, बँकेचा एनपीए 60% चे पुढे गेला आहे. ज्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेला 40 लाखाचा दंड केला तसेच ज्यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीबद्दल विविध पोलीस स्टेशनाला अर्ज दाखल आहेत व या अर्जांचे फौजदारी गुन्हा नोंदमध्ये रुपांतर होवून अटक होण्य़ाची टांगती तलवार असलेल्या व्यक्तींच्या समर्थकांनी बँकेच्या वसुलीबद्दल चकार शब्द न काढता बँकेची निवडणुक घेणेची भाषा वापरणे म्हणजे बँकेत उरलेल्या ठेवी व बँकेची मालमत्ता लुटण्याचे स्वप्न पाहण्याच्या उद्देशाशिवाय दुसरे काहीच दिसून येत नाही, असा दावाही कृती समितीचा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post