एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
नगरमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांचे खून प्रकरण गाजत असतानाच त्याआधी घडलेल्या पण मुख्य आरोपी सापडत नसल्याने चर्चेत असलेल्या वाळकीतील एका खुनातील मुख्य आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग यास अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी इंद्रजीत रमेश कासार यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, वाळकी येथे विश्वजीत प्रतिष्ठानच्यावतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्यावेळी विरोध केल्याचा राग मनात धरुन 17 नोव्हेंबर रोजी विश्वजीत कासार व त्याच्या इतर साथीदारांनी ओंकार बाबासाहेब भालसिंग याला जबर मारहाण केली होती. जखमी भालसिंग याच्यावर पुणे येथे उपचार चालू असताना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात कासार व त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपी कासार याला वाळकी येथे शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोलिस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश वाघ, विजय धनेधर, योगेश सातपुते, संभाजी कोतकर यांनी सहभाग घेतला. आरोपी इंद्रजीत रमेश कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द कोतवाली, नगर तालुका, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
Post a Comment