मुलाचा खुनी पोलिस शोधत नाहीत! आईने केली अण्णांकडे तक्रार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मुलाचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिस पकडत नाहीत, अशी तक्रार आईने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे वाळकीतील भालसिंग खून प्रकरण चर्चेत आले आहे.

नगर तालुक्यातील वाळकी येथे काही दिवसापूर्वी ओंकार भालसिंग याच्यावर खुनी हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक होण्यासाठी ओंकारची आई लता बाबासाहेब भालसिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन दिले. ओंकारला (वय 21) विश्‍वजीत रमेश कासार याने बळजबरीने गाडीत घालून लोखंडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी असलेला विश्‍वजीत रमेश कासार याच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. मात्र तो पसार असून, पोलीसांनी त्याला अटक केलेली नाही. तरी लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी ओंकारच्या आईने केली आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन देखील न्याय मिळत नसल्याने या महिलेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटून निवेदन दिले. मुख्य आरोपी विश्‍वजीत कासारला अटक करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही या महिलेने हजारेंशी चर्चा करताना केला.

Post a Comment

Previous Post Next Post