हेअर कलर लावताना काय काळजी घ्यावी?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

केस हा स्त्रिया व पुरुष यांच्यासाठी सौंदर्याचा दागिना समजला जातो. काही जण स्टाइल म्हणून केसांना रंग लावतात तर काही जण पांढरे केस लपवण्यासाठी केसांना रंगवतात. पण केसांना रंग लावताना काय काळजी घ्यावी..मुळात केसांना रंग लावणं ही एक रासायनिक प्रक्रिया असल्यानं ते करताना केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल तर केसांच्या छटेपेक्षा वेगळी छटा निवडा; परंतु तो तुम्हाला शोभेल याची खात्री करून घ्या. तसेच योग्य कलर केअर शॅम्पू, कंडिशनरचा वापर करावा. त्यांसह बदाम तेलाच्या वापरामुळे रंगवलेल्या केसांची काळजी घेता येते. रंग लावल्यावर केसांची खूप काळजी घ्यावी लागते. घरीच रंग लावताना योग्य ती काळजी न घेतल्यास केस निस्तेज होणं, कोरडे होणं, दुभंगणं अशा गोष्टी घडू शकतात.

केसांना रंग लावण्याआधी ते चांगले धुवून घ्या. शक्य असल्यास शाम्पूने केस धुवावेत. कंडिशनर लावू नका. कंडिशनरमुळे रंग नीट बसत नाही. धुतलेले केस टॉवेलच्या साह्यानं कोरडे करा. टॉवेलने जोरजोरात केस पुसू नका, म्हणजे ते तुटणार नाहीत. त्याऐवजी डोक्याला टॉवेल गुंडाळून केसांमधील पाणी टॉवेलने टिपून घ्या. केस वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका.

सर्वात महत्वाचं म्हणजे ओल्या केसांना रंग लावू नका. रंग लावताना हातात मोजे घाला. कपाळावर, कानांवर, मानेवर रंगाचे डाग पडू नयेत म्हणून व्हॅसलीन वा खोबरेल तेल लावा. रंग लावलेले केस लिंबाचा रस घातलेल्या पाण्याने धुवा, जेणेकरून रंग दीर्घकाळ टिकेल.

चुकीचा आहार
चौरस आहाराचा अभाव, जंकफूडचे आकर्षण, धावपळीची जीवनशैली यामुळे जीवनसत्त्वे, मूलद्रव्ये व प्रथिनांची कमतरता निर्माण होते आणि केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने तक्रारींची सुरुवात होते. त्यासाठी आहारामध्ये शेंगावर्गीय भाज्या, फळे, दूध, दही, ताक, हिरव्या पालेभाज्या, मोडाची धान्ये, मका इत्यादी अधिक प्रमाणात घ्यावे. यातून केसांना आवश्यक असलेली जीवनसत्त्वे (बी-३, बी-५, बी-९, बी-१२, क व ई जीवनसत्त्व ), लोह, प्रथिने व कॅल्शियम पुरेशा प्रमाणात मिळू शकतात. जीवनसत्त्वांच्या / लोह- कॅल्शियमच्या गोळ्या व इंजेक्शनेही घेता येतात.

Post a Comment

Previous Post Next Post