आधी 'कुंभकर्ण'.. मग 'दुसरे गांधी'.. अण्णांची विशेषणे चर्चेत


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''पंजाब-हरियाणाचे शेतकरी तिकडे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत थंडीत कुडकुडत आहेत व इकडे अण्णा हजारे कुंभकर्णासारखे झोपले आहेत, त्यांना जागवण्यासाठी त्यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद करणार आहे'', अशी भाषा वापरणाऱ्या उत्तर भारतातील काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अण्णांची भेट घेतल्यावर अण्णांना ''दुसरे गांधी'' असे संबोधून केलेले घुमजाव आता चर्चेत आहे. हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या समर्थकांना अण्णांना दुसरे महात्मा गांधी संबोधणे चुकीचे वाटणार नाही, पण अण्णांना कुंभकर्ण म्हणणेही आक्षेपार्ह वाटले नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील ३०-४० वर्षांच्या अण्णांच्या समाजोपयोगी वाटचालीत अनेक राजकीय नेत्यांनी अण्णांवर विविध आरोप केले, पण अण्णांच्या सामाजिक हेतूने केल्या जात असलेल्या व नैतिकतेचे पाठबळ असलेल्या जनआंदोलनांनी सर्वपक्षीय राजकारणी हादरले आहेत, शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे, त्यानंतर काहींनी अण्णांविरुद्ध विविध आरोप करून न्यायालयात खटलेही दाखल केले. पण कुंभकर्णसारखे विशेषण त्यांना कोणी लावले नाही. त्यामुळेच उत्तर भारतीय शेतकऱ्यांनी अण्णांची व त्यांच्या आतापर्यंतच्या नैतिक आंदोलनांची एकप्रकारे खिल्ली उडवल्यासारखे झाले आहे. त्यामुळेच यावर आता अण्णांच्या समर्थकांनी व्यक्त होणे व त्या शेतकऱ्यांकडून अण्णांची माफी मागायला लावणे गरजेचे आहे. राजकीय नेतेमंडळी यासाठी पुढाकार घेणार नाहीत, त्यामुळे सामान्य जनतेनेच अण्णांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी उत्तर भारतीय शेतकऱ्यांना भाग पाडण्याची गरज आहे.

माहिती अधिकारासारखे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्वसामान्याच्या हाती हक्काचे शस्त्र देण्याचे अण्णांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना दुसरे महात्मा गांधी संबोधणे चुकीचे वा अतिशयोक्तीचे नाही. पण अण्णा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात येत नाहीत म्हणून त्यांना कुंभकर्ण म्हणणे अयोग्यच आहे. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून अण्णांनी एकदिवसाचे उपोषण केले आहे, या आंदोलनाला पाठिंबा म्हणून झालेल्या भारत बंदलाही पाठिंबा दिला आहे, असे असताना केवळ ते दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होत नाही म्हणून त्यांना कुंभकर्ण म्हणणे गंभीर आहे. त्यामुळेच बहुदा अण्णांनीही दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होण्याऐवजी आपले स्वतंत्र आंदोलन दिल्लीत करण्याचे व त्यासाठी दिल्ली सरकारकडे जागा मागितल्याचे स्पष्ट केले असावे. मागील तीन वर्षांपासून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणाव्यात तसेच कृषीमूल्य आयोगाची स्वतंत्र स्थापना व्हावी, या मागण्यांसाठी अण्णा केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. त्या मागण्यांबाबत आश्वासने देऊनही दोन्ही सरकारे प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत नाहीत. शेतकऱ्यांसाठीच असलेल्या या मागण्यांना उत्तर भारतीय शेतकरी साथ देत नाहीत. पण त्यांच्या आंदोलनात अण्णा सहभागी होत नाही म्हणून त्यांच्याविषयी राग व्यक्त करताना काहीही विशेषणे लावत असतील तर हा अण्णांचा व त्यांच्या निरलस-नैतिक जीवनाचा अवमान आहे. त्यामुळेच आता भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाने उत्तर भारतीय शेतकऱ्यांना वास्तवाचे भान करून देणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर त्यांच्याही अण्णांविषयीच्या भावना तकलादू ठरणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post