अयोध्येतील 'त्या' मशिदीचे डिझाईन प्रसिद्ध


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अयोध्येतील पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे डिझाईन प्रसिद्ध झाले आहे. बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडदा पडला असून, सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले आहेत व बाबरी मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राम मंदिराचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू झाले असून, आता अयोध्येत मशिदीच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या मशिदीचे डिझाईन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने अयोध्येतील धन्नीपूर गावात उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे संकल्पचित्र प्रसिद्ध केले आहे. अयोध्येपासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावात मशिदीसाठी पाच एकर जागा देण्यात आली आहे. मशिदीचे भव्यदिव्य संकल्पचित्र फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, मशिदीबरोबरच एक रुग्णालयही उभारण्यात येणार आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्ट विभागातील (स्थापत्य कला) प्रा. एस. एम. अख्तर यांनी मशिदीचे संकल्पचित्र तयार केले आहे. तयार करण्यात आलेल्या आरेखनाला संबंधित विभागाकडून वेळेत आवश्यक परवानग्या मिळाल्या, तर २६ जानेवारीपासून मशिद उभारणीचे काम सुरू होऊ शकते. मात्र, जर वेळेत परवानग्या मिळाल्या नाही, तर २६ जानेवारीऐवजी दुसरी तारीख ठरवली जाईल, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.

मशिदीच्या शेजारीच रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे ट्रस्टनं काही दिवसांपूर्वीच सांगितले आहे. या पाच एकर जागेवर इंडो-इस्लामिक कल्चर संशोधन केंद्र (रिसर्च सेंटर), धर्मदाय रुग्णालय, कम्युनिटी किचन, संग्रहालय आणि सार्वजनिक ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या मशिदीचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही. या मशिदीला कोणत्याही सम्राट वा राजाचे नाव दिले जाणार नाही, असे सांगितले जाते. या मशिदीचे डिझाईन करताना जगभरातील मशिदींचे डिझाईन्स बघण्यात आले होते. जगभरातील मशिदींतील आधुनिक सुविधा लक्षात घेऊन हे डिझाईन तयार करण्यात आलं आहे, अशी माहिती ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post