पत्रकार बाळ बोठेचे इतर 'कारनामे' होऊ लागले उघड


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जरे हत्याकांडापासून पसार असलेला पत्रकार बाळ ज. बोठे याचे कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. संबंधित महिलेच्या कुटुंबियांशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन बोठेने या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार आहे. बोठेविरुद्ध दाखल या नव्या गुन्ह्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.

यशस्विनी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणामध्ये पसार असलेल्या आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे. रविवारी एका महिलेने बोठे याच्या विरोधामध्ये विनयभंग केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर बोठे याच्याविरुद्ध गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत संबंधित महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून, तिच्याशी अंगलट करून व अश्लील हावभाव करत छेडछाड केल्याचा प्रकार घडल्याचे त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात बोठे याच्याविरुद्ध कलम 354 व कलम 354 ड अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज महाजन करीत आहेत. 

जरे हत्येप्रकरणी पोलिसांनी याअगोदर पाच आरोपींना अटक केली आहे. पण, या घटनेतील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा आता २५ दिवस उलटून देखील तपास लागायला तयार नाही. पोलिसांचा वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू आहे. दोन ठिकाणी पथके पाठविण्यात आली आहेत. पण अजून यश आलेले नाही. त्यातच आता विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यामुळे यापुढे कशा पद्धतीने तपास होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांसमोर त्याला लवकरात लवकर शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

अनेकांचे जबाब नोंदविले
पोलिसांनी रेखा जरे यांचा मोबाईल हस्तगत केला असून, त्यातून अनेक गोष्टी तपासामध्ये पुढे आल्या होत्या, असे समजते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून गेल्या चार दिवसापासून तपासी अधिकाऱ्यांपुढे अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये काही महिलांचाही समावेश होता. शनिवारी दोन महिलांचे जबाब याप्रकरणी घेतले असल्याचे पुढे आले आहे. पत्रकार बोठे याचा ठावठिकाणा लागत नसताना दुसरीकडे त्याचा जवळचा मित्र डॉक्टर निलेश शेळकेला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, त्याला आर्थिक गुन्ह्यात वर्ग केले आहे. त्याचबरोबरीने बोठे याचा सुद्धा ठावठिकाणा लागतो का, त्याची काही माहिती शेळकेकडून मिळते काय, याचीसुद्धा पडताळणी त्याच्या चौकशीतून केली जात आहे.

काय आहे फिर्यादीत
बोठेविरुद्ध दाखल नव्या विनयभंगाच्या गुन्ह्यात सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० याकाळात वेळोवेळी विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी महिलेच्या कुटुंबाशी ओळख असल्याने बोठेचे त्यांच्या घरी येणे-जाणे असे. घरी आल्यावर कुटुंबियांशी बोलत असताना आपल्याकडे पाहून अश्लील कॉमेंटस करणे, हावभाव करणे, स्पर्श करणे तसेच मोबाईलवर संपर्क साधून पाठलाग करणे अशी कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post