करोना काळातील संतुलित आहार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

करोनाला दूर ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. कबरेदके, प्रथिने, चरबी, सर्व जीवनसत्त्वे व खनिजे हे योग्य त्या प्रमाणात सेवन केले तर शरीर सशक्त होते.

करोना या महासाथीच्या संकटामुळे सगळे जगच त्रस्त झाले आहे. या आजाराला ठाम असा काही उपचार अजून प्राप्त झालेला नाही. यात भर म्हणजे सुरू झालेली थंडी. थंडीत होणारा सर्दी-खोकल्याचा त्रास काही जणांना सुरू झाला आहेच. करोना असो अथवा थंडीतील सर्दी यांना लांब ठेवणे सध्या खूप गरजेचे आहे.

त्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे हा एकमेव मार्ग आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवूनही हा आजार होणारच नाही असे नाही. परंतु हा आजार होण्याची शक्यता नक्कीच खूप प्रमाणात कमी होते. तसेच आजार झाल्यास त्यामुळे होणारा त्रास कमी होतो आणि आजारातून लवकर बरे होता येते.

रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी?

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास संतुलित आहार घेणे यांसारखा दुसरा मार्ग असूच शकत नाही. कबरेदके, प्रथिने, चरबी, सर्व जीवनसत्त्व खनिजे हे योग्य त्या प्रमाणात सेवन केले तर शरीर सशक्त होते. मात्र काही अन्नघटक हे खास रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास शरीराला मदत करतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्व ब, ई व क यांचा समावेश आहे.

जीवनसत्त्व ड आणि के ही शरीरात तयार होऊ शकतात परंतु जीवनसत्व अ आणि सध्याच्या काळात गरज असलेली सर्व प्रकारची जीवनसत्व ब, जीवनसत्त्व क आणि ई शरीरात तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे ही जीवनसत्त्वे अन्नातून पुरवावी लागतात. याशिवाय जीवनसत्त्व ब व जीवनसत्त्व क ही पाण्यात विरघळणारी असल्यामुळे शरीरात साठवली जात नाहीत आणि त्यामुळे रोजच्या आहारातून ती शरीराच्या आरोग्यासाठी पुरवावी लागतात.

अन्नपदार्थातील स्रोत

प्रथिने, जीवनसत्त्व ब व जीवनसत्त्व ई हे अन्नघटक बऱ्याच अन्नापदार्थातून उपलब्ध होत असतात. जसे सर्व प्रकारची धान्ये आणि कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार, सुकामेवा, तेलबिया, फळ व भाज्या यांचा रोजच्या आहारात समावेश असावाच.

परंतु सध्या जीवनसत्व ‘क’वर विशेष जोर दिला जात आहे. याचे कारण या जीवनसत्वाचे स्रोत हे मुख्यत: फळ व भाज्या हे आहेत. कडधान्यांत थोडय़ाच प्रमाणात हे जीवनसत्त्व आढळते. इतर अन्नपदार्थात हे जीवनसत्त्व आढळत नाही.

प्रत्येक व्यक्तीला या जीवनसत्त्वाची गरज वेगवेगळी असते. पुरुषांना ९० मिलीग्रॅम तर महिलांना ७५ मिलीग्रॅम एवढी गरज असते. या काळात ही गरज वाढून ५००-१००० मिली ग्रॅम एवढी होते.

‘जीवनसत्त्व क’युक्त फळ व भाज्या

सर्व प्रकारच्या पालेभाज्या, टोमॅटो, सर्व रंगांच्या भोपळी मिरच्या, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, बटाटा व रताळी या भाज्यांमध्ये तसेच पेरू, संत्री, मोसंबी, अननस, पपई, स्ट्रोबेरी, आंबा या फळांमध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. कलिंगड, द्राक्ष व डाळिंब यातही हे जीवनसत्त्व थोडय़ा प्रमाणात असते. आवळ्यात सर्वात जास्त प्रमाणात जीवनसत्व क असते तसेच लिंबू आणि कोकम यातसुद्धा हे जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते.

सर्व फळे व भाज्या यांचा रोजच्या जेवणात खूप प्रमाणात वापर करावा. विविध प्रकारे केलेल्या भाज्या, भगर, पराठे, ग्रील केलेल्या भाज्या, भाज्यांचे सूप, फळांचे मिल्कशेक, स्मूदी या काही पदार्थामधून याचा समावेश करता येईल. शक्यतो आहारातून हे जीवनसत्व घ्यावे. मोड आणणे या प्रक्रियेतून जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण अन्नपदार्थात वाढते. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये वाफवून खावीत किंवा याची मिसळ, भेळ, सलाड, घावने हे पौष्टिक पदार्थ खावेत.

रोज करण्याच्या गोष्टी
  • रोज सकस व ताजे अन्न खावे. खूप प्रमाणात मैदा, साखर, तेल, बटर, क्रीम, चीज असलेले पदार्थ रोज खाणे टाळावे.
  • रोजचा चालणे, धावणे यापैकी कुठलाही व्यायाम करावाच. परंतु त्याचबरोबर प्राणायाम व इतर श्वसनाचे व्यायाम जरूर करावेत. त्याने शरीराला गरज असलेल्या प्राणवायूचा पुरवठा वाढतो. ज्यामुळे फुफ्फुसांची आणि इतर अवयवांची कार्यक्षमता वाढते.
  • मीठ, हळद घालून गरम पाण्याची वाफ रोज घ्यावी.
(कोणतेही उपाय, उपचार वैद्यकीय व आहारतज्ञांचा सल्ला घेऊनच करावेत.)

Post a Comment

Previous Post Next Post