जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

‘‘विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावी असून, जगाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या परंपरेत आहेत. विविधतांना जोडणारा घटक फक्त भारताजवळच असून, आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात केले. ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.

भागवत म्हणाले की, ‘‘एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया असे दोन ध्रुव जगात निर्माण झाल्याचे आम्ही पाहिले आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी इतर देशांना शस्त्रपुरवठा करून युद्ध करणे सुरू केले. सोबतच त्यांनी आर्थिक क्षेत्रावरही नियंत्रणास सुरुवात केली. त्यामुळे ‘शीतयुद्ध’ नावाची नवी युद्धशैली आम्ही पाहिली. त्यात अमेरिका जिंकली आणि रशियाचा पराभव झाला. त्यामुळे अमेरिका ही एक महाशक्ती बनली. आता अमेरिकेच्या वर्चस्वाखालीच सर्व सूत्रे हलणार, असे सांगण्यात येऊ लागले. पण तसे झाले नाही.’’

‘‘जगाला सुखी करण्याची गोष्ट तर दूरच, पण अमेरिका या जगाला एकत्रही ठेवू शकली नाहीत. कालौघात अनेक भाषा संपल्या, अनेक संस्कृतींचा अंत झाला, विविधतेची आणि पर्यावरणाची हानी झाली. संपूर्ण जगाच्या कल्याणाची इच्छा ‘मॅक्झिमम गुड्स, मॅक्झिमम पीपल’ पर्यंत मर्यादित आणि तीही काही मोजक्या देशांपुरती सिमीत राहिली’’,याकडे भागवत यांनी लक्ष वेधले. जगाच्या दक्षिण गोलार्धातील सारे देश नैसर्गिक साधन-संपत्तीने समृद्ध होते. विकसित देशांनी मोजक्या लोकसंख्येसाठी सारी साधने वापरली, असे भागवत यांनी सांगितले.

‘‘सर्वासाठी एकाच प्रकारचे प्रारूप चालू शकत नाही, हे २००५ साली अमेरिकेलाच सांगावे लागले. हे सर्व केल्यानंतरही इतर ध्रुव निर्माण झाले. यापैकीच एक चीन होता. तो नावापुरता साम्यवादी आहे. आम्ही समाजवादी आहोत, आम्ही कधी भांडवलशाहीकडे जाणार नाही असे चीन म्हणत होता. मात्र, असे होणार नाही, हे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्याचवेळी सांगितले होते. काही दिवस जाऊ द्या, चीन आपल्या मूळ स्वभावाकडे परत येईल आणि पूर्वीच्या विस्तारवादी धोरणाचा अंगिकार करेल असे गुरुजी म्हणाले होते आणि असेच घडत आहे, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले. चीन एक मोठी आर्थिक सत्ता झाला असून स्वत:च्या प्रभावाचा विस्तार करू इच्छितो. जग आपल्याबद्दल काय म्हणते, याची चीन काळजी करत नाही. स्वत:च्या हिमतीवर तो पुढे वाटचाल करत आहे. यामुळे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. जे जग एकध्रृवीय होते, ते आता बहुध्रुवीय झाले आहे. आता रशियाही आपला खेळ खेळत आहे. पाश्चिमात्य देशांना दडपून तो स्वत:ला पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे. या साऱ्या खेळात पश्चिम आशियातील देशांत गोंधळ माजला असून, त्याचे अनेक परिणाम जगावर होत आहेत. धार्मिक कट्टरतावाद पुन्हा उफाळून येत आहे. एक अशी अस्थिर अवस्था आली आहे; ज्यात विविधतेवर संकट आले आहे, जागतिक शांततेवर, लोकशाही व्यवस्थांवर संकट आले आहे. सुख तर मिळालेच नाही, पण पर्यावरणाच्या हानीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे, असेही सरसंघचालकांनी सांगितले.

अशा परिस्थितीत सारे जग भारताकडे आशेने पाहात आहे. इतर देश जगाला बाजार मानतात; पण भारत संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानतो. ‘सर्वाना सुख मिळो’, असा भारताचा विचार आहे. यात कुणालाही लहान मानले जाणार नाही, हाच विचार भारताला द्यायचा आहे. यात विकासही असेल, पर्यावरणाचे संरक्षण असेल, व्यक्ती अधिकारसंपन्न असेल आणि समाजही खऱ्या अर्थाने प्रबळ असेल, याचा भागवत यांनी गौरवाने उल्लेख केला.

आम्हाला अर्थव्यवस्थेची नव्याने उभारणी करावी लागेल. आमच्याजवळ जे आहे, त्याचा उपयोग सर्वासाठी व्हायला हवा. विद्येचा उपयोग ज्ञानवर्धन करण्यासाठी व्हावा. बळाचा उपयोग गुंडगिरीसाठी नाही, तर दुर्बलांच्या संरक्षणासाठी व्हायला हवा. धन मिळवू, तर दान करू, अशाप्रकारच्या विचारांसह भारत जगातील उणिवा दूर करेल. हे केवळ विचार करून होणार नाही, तर प्रत्यक्ष करून दाखवावे लागेल, याचीही भागवत यांनी जाणीव करून दिली.

आम्हाला लढून जगावर विजय मिळवायचा नाही. यासाठी आम्हाला रक्त सांडायचे नाही. बळजबरी आणि लोभ यांच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या मुळापासून वेगळे करायचे नाही. आम्हाला आमच्या देशाच्या उदाहरणातून जगाला या गोष्टी समजावून द्यायच्या आहेत. आम्हाला सध्याच्या ज्ञान- विज्ञानाचाही स्वीकार करायचा आहे. कुठलाही नेता हे करणार नाही, तर हे समाजालाच करावे लागेल, असेही भागवत यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post