नगरची राष्ट्रवादी मनुवादी भाजप समवेत; कॉंग्रेसची टीका


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महाराष्ट्रामध्ये एकीकडे भाजपसारख्या मनुवादी व जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी असताना नगर शहरामध्ये मात्र भाजप व राष्ट्रवादीची अभद्र युती आहे, ही खेदाची बाब आहे. स्थानिक राष्ट्रवादी या अभद्र युतीला जबाबदार आहे. या युतीमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही नगर शहराचा विकास खुंटला आहे, अशा शब्दात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर जोरदार टीका केली.

काँग्रेस पक्षाच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त सेल्फी विथ तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली. काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काळे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते व माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, निजामभाई जहागीरदार, डॉ.रिजवान अहमद, मागासवर्गीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, अल्पसंख्याकचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, एनएसयूआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, युवक काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, नामदेवराव चांदणे, मुबीनभाई शेख, डॉ. दिलीप बागल, अनंतराव गारदे, अनिसभाई चुडीवाल, नलिनीताई गायकवाड, जरीना पठाण, सुनीता बागडे, नीता बर्वे, कौसर खान, उषाताई भगत उपस्थित होते.

'मनपात भाजप व राष्ट्रवादीच्या मिलीभगतमुळे फक्त खिसे भरण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असून, सामान्य नगरकर मात्र समस्यांनी त्रासून गेला आहे. भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी नगर शहरात मात्र स्थानिक राष्ट्रवादी मोदी-फडणवीसांच्या भाजपसमवेत असल्यामुळेच शहराचा विकास खुंटला आहे', असा दावा काळे यांनी केला. 

शहरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट झाले आहे. घंटागाडी शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचू शकत नसल्यामुळे महिलांचे हाल होत आहेत. पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील ओढे-नाले रातोरात गायब होत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी दीप चव्हाण यांनीही मनपातील राजकीय स्थितीवर नाराजी व्यक्त करीत नागरिकांच्या प्रश्नावर महापालिकेत आक्रमक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले. 

यावेळी प्रशांत वाघ, क्रीडा काँग्रेसचे प्रवीणभैय्या गीते, अमितभाऊ भांड, सुजित जगताप, योगेश जयस्वाल, साहिल शेख, सोमनाथ गुलदगड, शबाना सय्यद, शाहीन बागवान, अनिल गायकवाड, अजय मिसाळ, सिद्धेश्वर झेंडे, शंकर आव्हाड, शरीफ सय्यद, अक्षय पाचारणे, संजय भिंगारदिवे,भाऊसाहेब डांगे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post