साबणातील रसायनांमुळे बालकांना श्वसनाचे विकार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लहान मुलांना त्यांच्या बालपणात जर घरात वापरले जाणारे साबण, भांडी धुण्याची रासायनिक अपमार्जके (डिर्टजट) यांचा सामना करावा लागला, तर त्यांना नंतर अस्थम्यासारखे विकार होतात. त्यात तीन वर्षांपासूनच्या मुलांचा समावेश होतो, असे एका संशोधनात दिसून आले आहे. यात श्वसनाच्या रोगात वेळीच काळजी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते, असे सांगण्यात आले.

‘सीएमएजे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार या संशोधनात एकूण दोन हजार मुलांचा अभ्यास करण्यात आला. त्यात जन्मापासून तीन ते चार महिने ज्या बालकांचा संपर्क हा साबण व अपमार्जकांशी आला त्यांचा समावेश यात होता. त्यानंतर त्यांच्यात अस्थमा किंवा खोकला आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात आली. यातील जी मुले ८०-९० टक्के वेळ घरातच होती व रसायनांना सामोरी जात होती, त्यांच्यात अस्थम्याचा विकार दिसून आला. यात त्यांची फुप्फुसे व त्वचेच्या माध्यमातून रसायनांचा समावेश त्यांच्या शरीरात झाला, असा दावा संशोधकांनी केला आहे.

कपडे धुण्याचा साबण, वेगवेगळे पृष्ठभाग धुण्याचे साबण, भांडी धुण्याचे साबण यांना ही मुले सामोरी गेली होती. यातील ज्या घटकात कृत्रिम सुगंध वापरण्यात आला होता, त्यांचा संबंध श्वसनाच्या विकारांशी असल्याचे दिसून आले आहे. या मुलांना पहिले ३-४ महिने तंबाखूच्या धुराला सामोरे जावे लागले नव्हते, तसेच त्यांच्या आईवडिलांना अस्थमा नसतानाही त्यांच्यात अस्थमा दिसून आला. याचा अर्थ घरातूनच होणाऱ्या रासायनिक प्रदूषणाने बालकांना धोका निर्माण होत असतो, हेच दिसून येते.

Post a Comment

Previous Post Next Post