कोरोनाचा अनोखा इफेक्ट.. चोरटेही घालू लागले पीपीई कीट;'सीसीटीव्ही'ला दिली बगल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीवर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिकांसह अन्य कर्मचारी पीपीई कीट परिधान करतात. यातून त्यांचे आरोग्य संरक्षण होते. पण या पीपीई कीटचा अनोखा वापर चोरट्यांनी सुरू केला आहे. बाजारपेठा वा दुकानांच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये दिसू नये म्हणून चोरटेही आता पीपीई कीट घालू लागले आहे. अशा चोरट्यांनी नुकतीच अकोले येथे एक मोबाईल शॉपी फोडून चोरी केली.

अकोले शहरातील हॉटेल जय महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेल्या मातोश्री काँप्लेक्समधील स्टार मोबाईल शॉपीचे शटर तोडून तीन चोरट्यांनी महागड्या कंपनीचे तीन ते चार लाख रुपयांचे मोबाईल चोरून पोबारा केला. विशेष म्हणजे या चोरट्यांनी पी.पी.ई.कीटसारखा संपूर्ण शरीर झाकलेला पोषाख परिधान केला होता.

कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत असलेल्या हॅाटेल जय महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेले समीर सय्यद यांचे स्टार मोबाईल दुकान बुधवारी मध्यरात्री ०२ वाजुन २७ मिनिटांच्या दरम्यान चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यानी दुकानाचे शटरचे लॅाक तोडून दुकानात प्रवेश करीत मोबाईल चोरट्यांनी गोणीत भरून नेले तसेच दुकानातील वस्तूंची तोडफोड केली आहे. चोरीचा हा सर्व प्रकार दुकानात असलेल्या सी.सी.टी.व्ही च्या शुटींगमध्ये आला आहे.यामध्ये तीनजण चोरी करताना दिसत असून त्यांनी चक्क पी.पी.ई.कीट सारखा पांढरा रंगाचा पोषाख परिधान केल्याचे दिसले आहे. चोरीची ही घटना सकाळी मातोश्री कॅाम्पलेक्सचे मालक दत्ता धुमाळ हे घराबाहेर आल्यावर स्पष्ट झाली. त्यांना दुकानाच्या शटरचे लॅाक तुटलेले दिसल्यावर त्यांनी दुकान मालक समिर सय्यद यांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर सय्यद यांनी दुकानात येऊन पाहणी केली व अकोले पोलिसात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी पथकासह घटनास्थळी जाउन पंचनामा केला आहे. चोरीच्या सी.सी.टी.व्ही.च्या फुटेजमध्ये सर्व प्रकार दिसत आहे. मात्र चोरी करताना कोविड संकटात वापरल्या जाणाऱ्या पी.पी.ई.किटचा वापर करुन चोरट्यानी आपली ओळख लपवत पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post