मुलांमधील नैराश्य घालवण्याचा सहज सोपा उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जी किशोरवयीन मुले एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहतात त्यांच्यात नैराश्याचा विकार जडण्याची शक्यता अधिक असते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘लॅन्सेट सायकिअ‍ॅट्री’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार जी किशोरवयीन मुले रोज साठ मिनिटे हलका व्यायाम करतात त्यांना नंतरच्या काळात नैराश्य जाणवत नाही. बाराव्या वर्षी जर त्यांनी हलका व्यायाम केला तर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण १० टक्के कमी राहते.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या अ‍ॅरोन कांडोला यांनी म्हटले आहे, की जी किशोरवयीन मुले एकाच ठिकाणी बसून राहतात त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण जास्त असते. बसून राहण्यापेक्षा काहीतरी शारीरिक हालचाली जी मुले करतात त्यांना पुढच्या आयुष्यातही त्याचा फायदा होतो. ४२५७ किशोरवयीन मुलांचा अभ्यास यात करण्यात आला, त्यानुसार जी मुले १२,१४,१६ या वयात आठवडय़ाला तीन दिवस १० तास शारीरिक हालचाली करीत असत त्यांच्यात नैराश्य कमी दिसून आले. यात फार मोठय़ा व्यायामाची आवश्यकता नसते तर साध्या शारीरिक हालचाली गरजेच्या असतात.

लक्ष न लागणे, नूर बदलणे यासारख्या गोष्टी शारीरिक हालचाली करणाऱ्या किशोरवयीन मुलांमध्ये कमी दिसून आल्या. जर १२,१४ व१६ या वयातील मुले नेहमीपेक्षा एक तास जास्त एकाच ठिकाणी बसून राहिली तर त्यांच्यात नैराश्य अनुक्रमे ११.१ टक्के, ८ टक्के, १०.५ टक्के इतक्या प्रमाणात वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत वाढते. या सर्व वयोगटातील मुलांनी जर जास्त काळ बसून काढला तर त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण सरसकट २८.२ टक्के वाढते. किशोरवयीन काळात एकाच ठिकाणी बसून राहण्याच्या सवयीने तारुण्यात पदार्पण करताना नैराश्याचा त्रास होऊ शकतो असा याचा अर्थ आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post