शारीरिक हालचालींमुळे मृत्यूची जोखीम कमी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शरीराची हालचाल अधिक प्रमाणात झाल्यास (मग या हालचालींची तीव्रता कितीही असो) मध्यमवयीन आणि वृद्ध व्यक्तींना लवकर मृत्यू येण्याची जोखीम कमी होते, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

या अभ्यासाचे निष्कर्ष ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (बीएमजे) प्रसिद्ध झाले आहेत. दिवसातील नऊ ते साडेनऊ तास एकाच ठिकाणी स्वस्थ बसून राहिल्याने, तसेच बैठय़ा कामामुळे (यात झोपेच्या वेळेचा समावेश नाही) लवकर मृत्यू होण्याची जोखीम असते, असा दावाही या अभ्यासात करण्यात आला आहे.

१८ वर्षांपासून ६४ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींनी आठवडाभरात किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम, शारीरिक क्रिया कराव्यात, किंवा कमीत कमी ७५ मिनिटे दमछाक करणारा व्यायाम-हालचाली कराव्यात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूत्रांमध्ये म्हटले आहे. अर्थात, हे सर्व प्रामुख्याने वैयक्तिक अनुभवांनुसार दिलेल्या माहितीवर आधारलेले आहे. यात अनेकदा अचूक माहितीचा अभाव असतो. त्यामुळे एखाद्याच्या आरोग्यासाठी त्याने नेमका किती वेळ आणि किती जोराचा व्यायाम करावा, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

संशोधकांनी मानवाच्या शारीरिक हालचाली आणि त्याने बसून व्यतीत केलेला काळ यांचा मृत्यूशी काय संबंध असू शकतो, याबाबत निरीक्षणात्मक अभ्यास केला आहे. व्यक्तीची दिवसातून किती हालचाल होते, हे मोजण्यासाठी त्यांनी एक्सिलेरोमीटरचा वापर केला. यात सावकाश चालणे, स्वयंपाक, भांडी धुणे अशा कमी तीव्रतेच्या हालचालींचा, तसेच वेगाने चालण्यासारख्या मध्यम तीव्रतेच्या हालचालींचा समावेश होता. अशा आठ पाहण्यांमध्ये ३६ हजार ३८३ लोक सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post