चलो दिल्ली : शेतकऱ्यांचे उपोषणास्त्र


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन, तर सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी शनिवारी सांगितले. आंदोलन तीव्र करण्याची घोषणा शेतकरी नेते कंवलप्रीतसिंग पन्नू यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केली.

राजस्थानातील शहाजहाँपूर येथून हजारो शेतकरी जयपूर - दिल्ली महामार्गावरून रविवारी सकाळी ११ वाजता ‘दिल्ली चलो’ आंदोलनास सुरुवात करतील, असे पन्नू यांनी सांगितले. देशाच्या इतर भागांतील शेतकरीही आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘‘सरकारला चर्चा करायची असेल, तर आम्ही तयार आहोत. मात्र हे तिन्ही कायदे रद्द करण्याची आमची मुख्य मागणी कायम असेल. त्यानंतरच इतर मागण्यांबाबत विचार केला जाऊ शकतो,’’ असेही पन्नू यांनी स्पष्ट केले.

नव्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांचे नेते १४ डिसेंबरला सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपोषण करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. सरकारने आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकऱ्यांनी तसे होऊ दिले नाही. हे आंदोलन शांततेने सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किमतीला असलेले संरक्षण नष्ट होईल. तसेच बाजार समितीची यंत्रणाही मोडीत निघून शेतकऱ्यांना मोठय़ा कंपन्यांच्या दयेवर राहावे लागेल, अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे वातावरण गढूळ करण्यासाठी काही ‘समाजकंटक’ तसेच ‘डावे आणि माओवादी’ घटक कारस्थान रचत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यासपीठाचा गैरवापर न होऊ देण्याबद्दल दक्ष राहावे, असे आवाहन सरकारने शुक्रवारी आंदोलक शेतकऱ्यांना केले होते.

निरनिराळ्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करणारे फलक हाती घेतलेल्या टिकरी सीमेवरील काही आंदोलकांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बुरख्याआड शेतकरी चळवळीचे वातावरण बिघडवण्याचा कट काही ‘समाजविरोधी घटक’ रचत असल्याचे कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले होते.

दोन दिवसांत तोडगा - चौटाला

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतल्यानंतर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाल यांनी शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा निघण्याची आशा शनिवारी व्यक्त केली. ते म्हणाले, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात येत्या दोन दिवसांत आणखी एक चर्चेची फेरी होईल आणि तीत आंदोलनाबाबत तोडगा निघेल.

हरियाणात टोलनाक्यांवर कब्जा

चंडिगड : नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा एक भाग म्हणून शनिवारी हरियाणात शेतकऱ्यांनी काही टोलनाक्यांवर ताबा मिळवला आणि पथकर वसुलीला अटका केला. अंबाला-हिसार महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४, हिसार-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील काही टोलनाक्यांवर पथकर वसुलीस आंदोलनाचा फटका बसला.

सीमांवर मोठा पोलीस फौजफाटा

शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिल्यामुळे दिल्ली सीमांवरील सुरक्षा व्यवस्थेत शनिवारी मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यात आली. दिल्लीच्या सीमांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून राजधानीकडे येणाऱ्या रस्त्यांवर काँक्रीटचे अडथळे उभारण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली-जयपूर महामार्ग रोखून धरण्याचा इशारा दिला आहे.

नवे कृषी कायदे कल्याणकारी - पंतप्रधान

नवी दिल्ली : सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी बांधील असून कृषी कायदे त्यांच्यासाठी कल्याणकारी आहेत, अशी ग्वाही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘फिक्की’च्या कार्यक्रमात दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळावी म्हणून पर्यायी बाजार उपलब्ध करण्याच्या उद्देशानेच नवे कृषी कायदे करण्यात आल्याचे आणि शेतकऱ्यांना आता शेतमाल मंडईत तसेच देशात कुठेही विकण्याची मुभा आहे, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान म्हणाले, की आता उद्योगांनी कृषीक्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे. दुर्दैवाने भारतीय कंपन्यांनी या क्षेत्रात पुरेशी गुंतवणूक केली नाही. खासगी कंपन्यांनी कृषीक्षेत्राचे सामथ्र्य जोखण्याचा प्रयत्नच केला नाही. केवळ मर्यादित पातळ्यांवर काम केले, असेही त्यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post