'त्याचा' झाला औषध पुरवठ्यावर परिणाम..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शेतकरी आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने उत्तर भारतातून देशभरात होणारा औषधांचा पुरवठा खंडित झाला आहे. अजून काही काळ अशीच स्थिती राहिल्यास देशभरात औषधांचा तुडवडा भासण्याचा धोका आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टने (एआयओसीडी) पंतप्रधानांना केली आहे.

देशातील बहुतांश औषध कंपन्यांचे उत्पादन हरियाणा व हिमाचल प्रदेशसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये होते व येथून औषध पुरवठा देशभरात होतो. परंतु शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून वाहतूक ठप्प झाल्याने येथून होणारा पुरवठाही गेल्या काही दिवसांपासून बंद झाला आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा औषधपुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी संघटनेने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच दुसरीकडे-औषध ही जीवनावश्यक वस्तू असून याच्या पुरवठय़ावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही संघटनेने आंदोलकांना केले आहे.

महाराष्ट्रातही झाला परिणाम
देशभरात लागणाऱ्या औषधांच्या १८ टक्के हिस्सा महाराष्ट्रात लागतो. यातील जवळपास ७० ते ७५ टक्के औषधांचा पुरवठा पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यामधून केला जातो. सध्या हा पुरवठा बंद आहे. औषध कंपन्या आगाऊ महिनाभराचा साठा करून ठेवतात. त्यामुळे अजून काही दिवस तरी तुटवडा भासण्याची शक्यता नाही. परंतु पुरवठा पूर्ववत न झाल्यास मात्र देशभरात सर्वत्रच औषधांचा ७० ते ७५ टक्के तुटवडा निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने खबरदारी म्हणून आधीच सरकारला सावध केले असल्याचे एआयओसीडीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

जातीय-प्रांतीय रंग देण्याचा प्रयत्न : शेट्टी
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला केंद्र शासनाकडून जातीय व प्रांतीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ८ डिसेंबरचा भारत बंद ताकदीने पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेले ११ दिवस पंजाबमधील शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून आमची संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. भारत बंद आंदोलनामध्ये सहभागी होऊन शेतकरी आपला शेतीमाल या दिवशी विकणार नाहीत. एक दिवस अन्नदात्यासाठी म्हणून सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे. तसेच ८ डिसेंबरला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद राहणार आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मंगळवारच्या भारत बंद आंदोलनाच्यादृष्टीने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. लोकशाही पद्धतीने निषेध आंदोलन करायला हरकत नाही, पण यात व्हायलन्स व्हायला नको, कायदा-सुव्यवस्थेला आंदोलकांकडून धक्का लागू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post