हिवाळ्यात आहारात करा मेथीचा समावेश.. जाणून घ्या फायदे..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हिवाळ्यात पालेभाज्याचे प्रमाण वाढते. तसेच या काळात आहारात अनेकजण पालेभाज्यांचा समावेशही करतात. मात्र, थोडी कडवट असल्याने मेथी काहीजणांना आवडत नाही. मात्र, मेथी आरोग्यासाठी गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आहेत. बटाट्याच्या भाजीसोबत किंवा मेथी पराठे आहाराचा स्वाद वाढवतात. त्यामुळे आहारात त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. तसेच सलाद म्हणून मेथीचा वापर केल्यास त्याचा आरोग्यालाही फायदा होतो.

मेथीची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयोगी आहेत. मेथीमुळे शरीरातील इन्शुलीनचे प्रमाण वाढत असल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. तसेच याच्यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारत असल्याने शरीरात लवकर साखर शोषली जात नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्याच्या आहारात मेथीचा समावेश केल्यास त्यांना फायदा होतो.

शरीरात कोलेस्टोरॉल वाढणाऱ्यांसाठीही मेथी फायदेशीर आहे. मेथीमुळे यकृतात कोलेस्टेरॉलची निर्मिती होत नाही. मेथीच्या पानाच्या सेवनाने शरीराला आवश्यक असलेले गुड कोलस्टेरॉल वाढत असून बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. लहान मुलांना स्तनपान करणाऱ्या मातांनी मेथीचे सेवन केल्यास त्यांना फायदा होतो. शरीरात दूधाची निर्मिती होण्यासाठी मेथीमुळे फायदा होतो. त्यामुळे प्रसूतीनंतर महिलांना मेथीची भाजी खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

मेथीमध्ये असलेल्या फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पोटाची कोणतीही समस्या असल्यास मेथीच्या सेवनाने फायदा होतो. मेथीच्या पानांमुळे अपचन, गॅस,पोटदुखी, पोट गच्च होणे अशा समस्या कमी होतात. आतड्यांना सूज असेल आणि अल्सरचा त्रास असलेल्यांनाही मेथीच्या सेवनाने फायदा होतो. तसेच अॅसिडिटी कमी करण्यासाठीही मेथी गुणकारी सिद्ध होते.

पुरुषांच्या शरीरात आवश्यक असणारे टेस्टोस्टेरॉन हार्मोन निमिर्तीसाठीही मेथीचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे हृदयरोगाची समस्या असलेल्यांनी रोजच्या आहारात मेथी किंवा मेथीच्या दाण्यांचा समावेश केल्यास त्यांचा त्रास कमी होतो. मेथीच्या सेवनाने हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता कमी होते. तसेच शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत असल्यास मेथीच्या सेवनाने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. जुना खोकला, त्वचाविकार,बॉन्क्रायटीस, अॅक्सिमाचा त्रास असल्यासही मेथीच्या सेवनाने फायदा होतो. त्यामुळे हिवाळ्यात मिळणाऱ्या पालेभाज्यांपैकी मेथीचा आहारात समावेश केल्यास त्याचे फायदे दिसून येतात.

Post a Comment

Previous Post Next Post