'भाजपनंतर फक्त अदानी व अंबानीच देशभक्त आहेत, बाकी सर्व देशद्रोही'

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर मुक्काम ठोकून आंदोलन करत आहेत. तर, सरकारसोबतची चर्चा वारंवार फिस्कटल्याने आता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन अधिकच तीव्र केलं आहे. या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मोदी सरकारच्या दृष्टीने या देशात भाजपनंतर केवळ अदानी आणि अंबानी देशभक्त आहेत, बाकी सर्व देशद्रोही. असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तर दुसरीकडे भाजपचे मंत्री तसेच नेते मंडळींकडून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या आंदोलनात खलिस्तानी, चीन व पाकिस्तानचा हात असल्याची वक्तव्य भाजपा नेत्यांकडून केली गेली आहेत. तर, नुकतच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देखील शेतकरी आंदोलनाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. भाजपा मंत्री व नेतेमंडळींच्या या विधानांच्या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी मोदी सरकारव टीका केली आहे.

खलिस्तानी, चीन आणि पाकिस्तानशी संबंध, देशद्रोही, हे तर शेतकरीच नाही – यानंतर आता नक्षली…मोदी सरकारच्या दृष्टीने या देशात भाजपा नंतर केवळ अदानी आणि अंबानी देशभक्त आहेत, बाकी सर्व देशद्रोही. बांधवांनो लोकशाही वाचवा, भाजपा हटवा. असं सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

नुकतच केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत एख धक्कादायक विधान केल्याचं समोर आलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post