अबब.. 'गावगाडा' चालवण्यासाठी २३ हजार जण आले पुढे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मागील वर्षभरातील करोना संकट झुगारून देऊन व नवीन वर्षाचा नवीन विकास संकल्प हाती घेऊन ग्रामीण गावगाडा चालवण्यासाठी जिल्ह्यातील २३ हजार ८१८जण पुढे आले आहेत. अर्थात ही मंडळी पुढे आली ती ग्रामपंचायत निवडणूक लढवून गावगाडा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी. या प्रत्येकाकडे आपल्या गावच्या सर्वांगीण विकासाचा स्वतंत्र आराखडा व उद्देश असणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच नव्हे तर राज्यभर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा जो आवाज आमदार मंडळींकडून दिला जातोय, त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींसाठी २३ हजार ८१८ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. छाननीत यापैकी काहीजणांचे अर्ज बाद झाले तरी सुमारे २३ हजारजण रिंगणात राहणार आहेत व यापैकी ४ जानेवारीला अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीच्या दिवशी कितीजण 'रणछोडदास' होतात, यावर किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, निवडणुकीच्या माध्यमातून गावा-गावांतून सुरू असलेल्या राजकीय खेळ्या पाहता बिनविरोध निवडणुकीचा फुगा फुटण्याचीच जास्त चिन्हे आहेत.

राज्यभरातील १४ हजारावर ग्रामपंचायतींच्या येत्या १५ जानेवारीला निवडणुका होणार आहेत. या दिवशी मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच पारनेरचे आ. निलेश लंके, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्यासह अन्य काहीजणांनी बिनविरोध ग्रामपंचायतीला २५ ते ३० लाखाचा आमदार निधी देण्याची घोषणा केली होती. गावांना असे प्रलोभन दाखवण्यावर विरोधी पक्षांकडून टीकाही झाली. गावागावांना लुटणाऱ्या टोळ्या यानिमित्ताने एक करून त्यांनी एकत्र मिळून गावांना लुटण्याचा कार्यक्रम करण्यासाठी हा बिनविरोधचा फंडा असल्याचा आरोपही झाला होता. तसेच गावांना असे पैशांचे प्रलोभन दाखवण्यातून निवडणुकीत स्पर्धा होत नाही, ज्यांना ग्रामपंचायत सदस्य वा सरपंचपदाच्या माध्यमातून गावाची सेवा करायची, गावाचा विकास मार्गी लावायचा, अशांना मतदारांसमोर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळत नाही, असेही बोलले गेले. याउपर, गावांना बिनविरोधसाठी पैशांचे आमीष दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणीही प्रशासनाकडे झाली आहे. बिनविरोधसाठी विकास निधीच्या आमीषावरून माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व आ. रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुराही रंगला आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा अधिक रंगात आला आहे. गावा-गावांजवळचे धाबे रोज सायंकाळी फुल्ल भरू लागले आहेत. मैदानात उतरलेला प्रत्येकजण आपल्या मतांच्या बेगमीसाठी विविध फंडे राबवू लागला आहे. त्यामुळे येत्या ४ जानेवारीला कितीजण माघार घेतात व कितीजण रिंगणात राहतात, यावर निवडणुकांची रंगत वाढणार आहे व याच दिवशी जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार हेही स्पष्ट होणार आहे.

आताच्या स्थितीत तालुकानिहाय दाखल झालेली अर्ज संख्या -
(अनुक्रमे तालुका-ग्रामपंचायत संख्या व आलेले अर्ज)


अकोले-५२-११५३, संगमनेर-९४-२६७८, कोपरगाव-२९-९९६, श्रीरामपूर-२७-११०९, राहाता-२५-१२०८, राहुरी-४४-१४०७, नेवासे-५९-२०७२, नगर-५९-१९२९, पारनेर-८८-२३८९, पाथर्डी-७८-२३२८, शेवगाव-४८-१३३२, कर्जत-५६-१७५२, जामखेड-४९-१३०२ व श्रीगोंदा-५९-२१६३. एकूण-७६७-२३८१८.

Post a Comment

Previous Post Next Post