'ती' पावती देता येईल, पण..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक राखीव जागांवर लढवणारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास ते मिळवण्यासाठी केलेला अर्ज व त्याची पावतीही उमेदवारी अर्जासोबत जोडता येणार आहे. पण अशी पावती जोडताना हमीपत्र द्यावे लागणार असून, त्यात १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची हमी द्यावी लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर उमेदवारी करणारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक असणार आहे. अर्थात ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्रच असेल, त्यांना अशी पावती जोडण्याची गरज राहणार नाही. राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post