ग्रामपंचायत रणधुमाळी : आणखी एका आमदाराने केले 'ते' आवाहन व दिला 'तो' शब्द..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली तर २५ लाखाचा आमदार निधी त्या गावाला देण्याची घोषणा पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केल्यावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी एका आमदाराने असे बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीचे आवाहन केले आहे. पण त्यांनी विशिष्ट रकमेच्या विकास निधीची घोषणा मात्र केली नाही. पण अशा समंजस गावांतील विकास कामांना निधी मात्र कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी हे आश्वासन दिले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील २७ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. येत्या ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे आमदार कानडे यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. ते यासंदर्भात म्हणतात की, निवडणुका लोकशाहीचा मूलभूत पाया आहेत, परंतु निवडणुकांचे आजचे स्वरुप स्पर्धात्मक न राहता युद्धजन्य बनले आहे. अनेक पक्ष व गट, ग्रामपंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने आपले वर्चस्व गावावर राहावे म्हणून काही कारभा-यांना आपलेसे करुन स्वत:च्या गटाची पार्टी तयार करुन लोकांना झुंजवतात. एकाच गावचे गावकरी अनेक गटा-तटामध्ये दुभंगले जातात.निवडून येण्याच्या इर्षेने एकमेकांना शाब्दीक जखमा होतात. काही हाणामारीचे प्रसंगही उद्भवतात, म्हणून हे सर्व टाळावयाचे असल्यास ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीच्या सदस्यांची नियमानुसार बिनविरोध निवड केल्यास गावातील प्रेम व सौहार्द टिकू शकते व त्याचा परिणाम गाव शिवारासाठीच्या शासनाच्या विविध योजना एकजुटीने राबविण्यासाठी मदत होते, गावाचा झपाटयाने विकास होतो. हिवरेबाजार सारखी उदाहरणे आपल्याच जिल्हातील आहेत. म्हणूनच मतदार संघातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात व अशा समंजस गावांसाठी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी मी ग्वाही देतो, असे आमदार लहू कानडे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था जनतेच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण झाल्या. स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता, अंतर्गत दळणवळण, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी आणि पशुसंवर्धन असे ग्रामीण जीवनाचे रोजचे विषय ग्रामपंचायतीकडे अधिनियमानुसार सुपूर्द केलेले आहे. मी तब्बल २७ वर्षे ग्रामविकास प्रशासनात काम केल्याने यासाठीचे कायदे व योजनांची मी प्रत्यक्ष अंमलबजावणी केलेली आहे. माझ्या अनुभवाने एक सुंदर गोष्ट मला शिकवली व ती म्हणजे गाव करील ते राव काय करणार? आणि यासाठी आवश्यक आहे संपूर्ण गावाची एकजुट. हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्ष राबवितांना हा अनुभव वारंवार आला, अशीही आठवण त्यांनी यानिमित्ताने या निवेदनात नमूद केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post