सरकारच्या 'या' निर्णयाचे 'हिंदू जनजागृती'कडून स्वागत; केली 'ही' मागणी

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शासकीय कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट परिधान करण्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घातलेल्या बंदीच्या निर्णयाचे स्वागत व महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन हिंदू जनजागृती समितीने केले आहे. तसेच यानिमित्ताने, महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता (पोषाख) लागू करण्याची मागणीही केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या शासनाने नुकतीच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार यापुढे अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पँट, टी-शर्ट, भडक रंगाचे वा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच स्लीपर वापरता येणार नाही. केवळ शोभनीय वस्त्र घालण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो, अशी भावना हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केली आहे. यानिमित्ताने त्यांनी अशी मागणी केली आहे की, काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानने भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याचे अनुसरणीय आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्याची वस्त्रसंहिता लागू करावी. याविषयी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून मागणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या पत्रात म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीअनुरूप वस्त्रसंहिता लागू केल्यामुळे मंदिरातील पावित्र्य आणि श्रद्धाभाव टिकून राहण्यास साहाय्य होईल. भारतीय वस्त्र पाश्‍चत्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रचार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये सार्थ स्वाभिमानही जागृत होईल. तसेच पारंपारिक वस्त्र निर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. यासाठी राज्य शासनाने मंदिरांतून वस्त्रसंहिता लागू करण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने या पत्रात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post