बाळ बोठे 'फरार' घोषित होणार? पोलिसांकडून हालचाली सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ बोठे सापडत नसल्याने त्याला फरार घोषित करून त्यानंतर त्याच्याविरुद्धच्या अन्य कायदेशीर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. यासाठीची स्टँडींग ऑर्डर पोलिसांकडून न्यायालयाद्वारे घेतली जाणार आहे व त्यासाठीची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबरला निर्घृण खून झाला असून, या प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा शोध सुरू आहे, अद्यापपर्यंत तो सापडलेला नाही. त्यामुळे आता कायदेशीर बाबींचा आधार घेत न्यायालयामध्ये स्टँडिंग ऑर्डरसाठी कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रेखा जरे हत्याकांडाला आता 21 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीमध्ये पत्रकार बाळ बोठे याचा समावेश आहे. तो अजून सापडलेला नाही. नगरच्या न्यायालयामध्ये त्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.  

पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी त्याचा तपास पुन्हा सुरू केला. मात्र अद्यापपर्यंत तो आढळून आलेला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके पाठवलेली आहेत. त्याचा शोध सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांच्या हाती काही धागेदोरे होते, त्यांची शहानिशा सुद्धा पोलिसांनी केली आहे. पण आरोपीचा शोध लागायला तयार नाही. त्यामुळे आता कायदेशीर बाबींचा अवलंब करून न्यायालयामध्ये त्यासंदर्भात स्टॅंडिंग ऑर्डर घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आम्ही लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जरे प्रकरणासंदर्भामध्ये आमच्याकडे सक्षम पुरावे आहेत. बोठे याचा जो फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे, त्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही पुढील कारवाई निश्चितपणे करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

संघटित गुन्हेगारीचा बीमोड करणार
जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्याचा विषय हाती घेतलेला आहे. ज्यांच्यावर अधिक गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यासंदर्भात तडीपारीचा प्रस्ताव, मोक्काअंतर्गत कारवाईचे प्रस्ताव लवकरच तयार होतील व त्याची अंमलबजावणी सुद्धा तात्काळ केली जाईल, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. 

1 Comments

  1. गेला बाळ कुणीकडे पोलीस शोधतयात चोहीकडे तरीही बाळ सापडत नाही कोणाकडे ही (याचा अर्थ भक्कम मजबूत पाया आहे बाळ चा त्याला नक्कीच मोठा साथीदार असेल

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post