चाळीशीपूर्वीच लठ्ठपणा वाढतोय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वयाच्या चाळिशीपूर्वी लठ्ठ, प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या व्यक्तींना विविध प्रकारचे कर्करोग होण्याची जोखीम अधिक प्रमाणात असते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इपिडेमिलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

त्यानुसार, वयाची चाळिशी गाठण्यापूर्वी ज्या व्यक्तींचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असते, त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता तुलनेत ७० टक्क्यांनी जास्त असते. अशा व्यक्तींना मूत्रपिंडाच्या पेशींचा कर्करोग होण्याची शक्यता ५८ टक्क्यांनी अधिक, तर पचनमार्ग, गुदद्वाराचा कर्करोग होण्याची जोखीम ही २९ टक्क्यांनी अधिक असते. महिला आणि पुरुष या दोन्ही वर्गवारीत लठ्ठपणामुळे कर्करोग होण्याची जोखीम ही तुलनेत १५ टक्क्यांनी जास्त असते, असे या अभ्यासात नमूद केले आहे.

या संशोधनात नॉर्वेमधील बर्जिन विद्यापीठातील शास्त्रज्ञही सहभागी झाले होते. त्यांनी कर्करोगाचे संभाव्य निदान होण्यापूर्वी संबंधित प्रौढ व्यक्तींची किमान तीन वर्षांच्या अंतराने दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वजनाची मोजणी केली होती. २००६ मध्ये सुरू झालेल्या ‘मी कॅन स्टडी’ अभियानात सहभागी झालेल्या दोन लाख २० हजार व्यक्तींबाबतचा तपशील या शास्त्रज्ञांनी तपासला. कर्करोगाच्या जोखमीशी संबंधित असलेले चयापचय क्रियेचे घटक अभ्यासण्यासाठी हे अभियान घेण्यात आले होते.

‘मी कॅन स्टडी’मध्ये नॉर्वे, स्वीडन आणि ऑस्ट्रेलियातील एकूण पाच लाख ८० हजार लोकांची पाहणी करण्यात आली होती. यापैकी २७ हजार ८८१ व्यक्तींची पुढील काळात तपासणी केल्यावर त्यांना कर्करोगाची लागण झाल्याचे दिसून आले. या कर्करोग रुग्णांपैकी नऊ हजार ७६१ जणांना झालेला कर्करोग हा लठ्ठपणाशी संबंधित होता, असे अभ्यासकांनी नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post