जरे हत्याकांड : बोठेविरुद्ध गुन्ह्यांची मालिका सुरू.. खुनाचे कारण अद्याप अस्पष्टचएएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला एकीकडे एक महिना होत असताना दुसरीकडे या खुनाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरोधात एकाच महिन्यात तीन गुन्हे दाखल होऊन एकप्रकारे गुन्ह्यांची मालिका सुरू झाल्याचे दिसू लागले आहे. पण पुढे काय, हा प्रश्न कायम आहे. पसार बोठे अजूनही सापडलेला नाही व जरे यांची हत्या सुपारी देऊन झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असले तरी या खुनामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच अनेक अट्टल व सराईत गुन्हेगारांना पकडणाऱ्या नगरच्या पोलिसांना अजूनही जरे हत्येतील प्रमुख आरोपी बोठेला पकडता आले नाही. यातून पोलिसांची हतबलता दिसते की, यामागेही पोलिसांचा काही गेम आहे, याचीच चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे. 

३० नोव्हेंबरच्या रात्री ८च्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात पकडलेल्या पाच आरोपींकडून या खुनाची सुपारी पत्रकार बाळ बोठेने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पण या खुनामागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही व बोठेही अजून सापडलेला नाही. दुसरीकडे त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नुकताच काही दिवसांपूर्वी महिलेचा विनयभंग केल्याचा व दोन दिवसांपूर्वी महिलेकडे १० लाखाची खंडणी मागितल्याचाही गुन्हा आता दाखल झाला आहे. महिनाभरात तीन गुन्हे व तेही महिलांसंदर्भातीलच खून, विनयभंग व खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने तोही आता चर्चेचा विषय झाला आहे. 

नगरचे पोलिस गुन्हे करून फरार झालेल्या अनेक नराधमांना कौशल्याने पकडून आणतात. पण बोठेच्या बाबतीत मात्र त्यांचा शोध अपयशी ठरला आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेल्यानंतर पोलिसांनी त्याचे सहकारी व जवळच्या व्यक्तींची कसून चौकशी करून त्यांचे जबाब घेतले असले तरी या जबाबात त्यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा प्रत्यक्ष बोठे ताब्यात आल्याशिवाय होणार नाही. तसेच त्याच्याकडूनच जरे यांच्या हत्येचे कारणही स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच पोलिस त्याचा शोध घेण्यात का अपयशी ठरत आहेत, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिसांची ही हतबलता आहे की, त्याच्याविरुद्ध दाखल होत असलेले एक-एक गुन्हे पाहता सापळा रचला जात आहे, याचीही चर्चा आहे. 

नुकत्याच दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्याच्यासमवेत सहआरोपी वैद्यकीय अधिकारी भागवत दहिफळे यांचाही समावेश आहे. यातील फिर्यादी महिलेची वैयक्तिक माहिती माहितीचा अधिकाराचा अर्ज देऊन मागवून फिर्यादीस तुम्ही कार्यालयाची परवानगी न घेता निवडणूक लढवली आहे. यातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर दहा लाख रुपये देऊन तडजोड करा अशाप्रकारे खंडणी मागितली व त्यांनी ही रक्कम न दिल्याने तो काम करत असलेल्या वर्तमानपत्रात फिर्यादी विरोधात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून फिर्यादीची बदनामी केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांना आता जरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यासह विनयभंग व खंडणीच्या गुन्ह्यातही बोठेला पकडण्याचे आव्हान आहे.

कँडल मार्चला पाठिंबा

जरे यांच्या हत्येला एक महिना झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जरे कुटुंबियांनी बुधवारी (३० डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता कापड बाजारातील भिंगारवाला चौकापासून जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत कँडल मार्च आयोजित केला आहे. या कँडल मार्चमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडसह रामरहिम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान, स्टुडंट पॉवर फाउंडेशन, अहमदनगर संघर्ष समिती, जनआधार फाउंडेशन, समाजवादी पक्ष, मनसे, अहमदनगर सोशल क्लब, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हेल्पींग हँड युथ फाउंडेशन, फुले ब्रिगेड, नगर शहर काँग्रेस कमिटी, भिंगार शहर काँग्रेस कमिटी व टिपु सुलतान प्रतिष्ठान आदी संस्था सहभागी होणार असून, नगरमधील सुजाण नागरिकांनीही यात सहभागी होण्याचे आवाहन जरे कुटुंबियांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post