'त्यात' गुन्हा दिसतोय.. 'कोतवाली'चे 'नगर अर्बन'च्या प्रशासकांना पत्र


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील अडीच कोटीच्या अपहार प्रकरणाच्या तक्रारीची तपासणी केल्यावर प्रथमदर्शनी हा गुन्ह्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद देऊ शकता, असे पत्र कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना दिले आहे. यामुळे नगर अर्बन बँकेच्या विश्वात खळबळ उडाली आहे. मागच्या पाच-सहा महिन्यापासून या अपहाराच्या गाजत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनीच गुन्हा दाखल करून घेण्याची तयारी दाखवली असल्याने त्याला बँकेचे प्रशासक मिश्रा यांच्याकडून प्रतिसाद मिळतो की नाही व तो गुन्हा दाखल होतो की नाही, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

बँकेची मुख्य शाखा व अन्य शाखांतील संशयास्पद व्यवहारातून अडीच कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे सांगितले जाते. त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पण बँकेकडून कोणी फिर्यादी होत नसल्याने हा गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर कोतवालीच्या पोलिसांनी आता बँकेच्या प्रशासकांनाच पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवल्याने ते याला प्रतिसाद देतात की नाही, याचे कुतूहल व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी प्रशासक मिश्रा यांना १० डिसेंबरला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ११ सप्टेंबर २० रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, मुख्य व्यवस्थापक सतीशकुमार रोकडे, प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे व मुख्य शाखेचे शाखाधिकारी मारुती औटी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. तसेच बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनीही या अडीच कोटी रुपये रकमेच्या अपहाराबद्दल तक्रार दिली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्जदार यांनी कट रचून व संगनमताने बँकेत खोटी कागदपत्रे तयार करून अडीच कोटीचा अपहार केला व ठेवीदार आणि सभासदांची फसवणूक केली आहे तसेच प्रशासकांच्याच आदेशान्वये चौकशी अधिकारी अॅड. डी. व्ही. चंगेडे यांनी चौकशी करून २९ जून २०२० रोजी प्रशासकांना अहवाल दिला असून, त्याद्वारेही हा अपहार स्पष्ट होत असल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केली आहे. या दोन्ही तक्रारींची तपासणी केल्यावर त्यामध्ये प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे याबाबत आपण (प्रशासक मिश्रा) वा आपण प्राधिकृत केलेल्या वरील चारजणांपैकी कोणीही कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद द्यावी, असे या पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता बँकेचे प्रशासक या पत्राची दखल घेतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे.

असा झाला अपहार

नगर अर्बन बँकेतील या बहुचर्चित अडीच कोटीच्या अपहाराबाबत माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेली माहिती अशी की, फेब्रुवारी 2019 च्या रिजर्व बँकेच्या तपासणी अहवालानुसार बँकेच्या तब्बल 1 कोटी 47 लाखाच्या रकमेचा हिशोब जुळत नाही व बँकेची ही मोठी रक्कम बँकेच्या मुख्य शाखेतून बँकेच्या मार्केट यार्ड शाखेला पाठविली, असे लिहिले होते, पण प्रत्यक्षात ही रक्कम मार्केट यार्ड शाखेला पोहचलीच नव्हती. मग ही रक्कम गेली कोणीकडे याचा शोध घेण्यासाठी त्यांनी प्रशासकांकडे तक्रार केली. प्रशासकांनी याबद्दल सखोल चौकशीची जबाबदारी बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर दिली व त्याप्रमाणे चौकशी केल्यानंतर हा 1 कोटी 47 लाखाचा अपहार झाल्याचा निष्कर्ष तर निघालाच, पण अशीच आणखी एक 1 कोटी 03 लाखाची संशयास्पद नोंद सापडली व हा अपहार एकूण 2 कोटी 50 लाखाचा असल्याचा अहवाल प्रशासकांना सादर करण्यात आला. प्रशासकांनी यावर पुन्हा एक चौकशी अधिकारी नेमून या अपहाराची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते. या चौकशी अधिकाऱ्याने सर्व संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जाबजबाब घेतले व अपहारासाठी जबाबदार असल्याबद्दलचा काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांसह अहवाल प्रशासकांना दिला आहे. प्रशासकांनी याबद्दल पोलीस फिर्याद दाखल करणेसाठी अँड. योहान मकासरे यांची नेमणूक करून त्यांच्याकडून कायद्याचे चौकटीत बसणारी सविस्तर फिर्याद बनवून घेतली व बँकेच्या अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला जावून फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता पोलिसांद्वारेही या तक्रारींची चौकशी होऊन अपहाराचा गुन्हा घडल्याचे स्पष्ट होत आहे व तसे पत्र पोलिसांनी बँकेच्या प्रशासकांना दिले आहे. त्यामुळे आता प्रशासकांची त्याची दखल घेऊन तातडीने हा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करावा, अशी मागणीही राजेंद्र गांधी यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post