रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय; जाणून घ्या फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

करोना व्हायरसवर मात करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती चांगली असावी लागते. त्यासाठी घरगुती उपाय कधीही चांगले. लिंबू-पाणी किंवा सरबत पिण्यामुळे तुमच्यातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय सहज आणि स्वस्तात उपलबद्ध असणाऱ्या लिंबू पाण्यासामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

उन्हाळ्यामुळे होणारी शरीराची लाहीलाही आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यां यांवर काही उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून जास्तात जास्त पाणी पिणे आवश्यक असते. मात्र याबरोबरच शहाळं पाणी, ताक, सरबते घेणेही आवश्यक असते. यात सर्वात उपयुक्त असे लिंबू सरबत उन्हाळ्यातील त्रासांवर रामबाण उपाय ठरु शकतो. उन्हामध्ये लिंबू सरबत घेतल्यामुळे ताजेतवाने राहण्यास मदत होते. उन्हामुळे शरीरातील कमी झालेली ताकद भरुन येण्यास याची मदत होते. लिंबातल गुणधर्म आरोग्यासाठी उपयुक्त असतातच मात्र साखर आणि मीठाचाही थकवा कमी होण्यासाठी चांगला उपयोग होतो.

पाहूयात लिंबू सरबताचे आरोग्याला होणारे फायदे…

१. दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास लिंबूपाण्यामुळे मदत होते.

२. सध्या लठ्ठपणा ही एक मोठी समस्या झाली आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही वजन कमी करायचे असल्यास लिंबूपाणी घेणे उपयुक्त ठरते. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते.

३. साखर न घालता घेतलेले पाणी मधुमेहींसाठीही उपयुक्त असते. तसेच यामध्ये कॅलरीज नसल्याने शरीरात साठणारे फॅटस साठत नाहीत.

४. लिंबात असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

५. दुपारी जेवणानंतर लिंबूपाणी प्यायल्यास खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.

६. उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो.

लिंबू सरबत कसे कराल तयार?

चार ग्लास सरबताकरता साहित्य : २ ते ३ मोठी लिंबं, ८ चमचे साखर, चार ग्लास थंड- शक्यतो माठातले पाणी, दोन हिरव्या वेलच्यांचे दाणे आणि २-३ चिमूट मीठ.

अन्य साहित्य : एक गंज किंवा पातेलं आणि डाव किंवा मोठा चमचा, लिंबू कापण्याकरता चाकू किंवा सुरी आणि लिंबू पिळण्याकरता महादेव किंवा लिंबू पिळायचा चिमटा, वेलची कुटण्याकरता छोटा खलबत्ता.

कृती : लिंबं चांगली स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. निम्मी चिरून त्यातील बिया काढून टाकून द्या. चिमटय़ाने किंवा महादेवावर लिंबू पिळणार असाल तर बिया आपोआपच वेगळ्या होतात. लिंबू हाताने पिळणार असाल तर मात्र बिया न चुकता काढा. मोठय़ा गंजात किंवा पातेल्यामध्ये चार ग्लास पाणी मोजून आधीच घेऊन ठेवा आणि त्यात लिंबाचा रस टाका. दोन हिरव्या वेलच्या सोलून त्यातील बिया थोडय़ा साखरेसोबत कुटून घ्या. साखर, मीठ आणि वेलची-साखरेचा कुट्टा लिंबूरस टाकलेल्या पाण्यात घालून चांगलं ढवळा. साखर आणि मीठ चांगलं विरघळायला हवं. चव घेऊन पाहा. जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवा.

Post a Comment

Previous Post Next Post