आव्वाज कोणाचा.. जिल्ह्यातील ७६७ गावात रणधुमाळी; ग्रामपंचायत निवडणुका जाहीर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मागील ८-९ महिन्यापासून कोरोनामुळे हवालदिल झालेल्या गावा-गावातील राजकीय नेतेमंडळींकडून आता आव्वाज कोणाचा...अशी हाळी मारली गेली आहे. निमित्त आहे-ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होण्याचे. जिल्ह्यातील ७६७ गावांतून येत्या १५ जानेवारीला निवडणुका होणार आहेत. गावा-गावातील भाऊबंदकीच्या राजकारणाला या निवडणुकांमुळे रंग चढणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९४ गावांतील निवडणुका संगमनेर तालुक्यात व सर्वात कमी २५ गावांतील निवडणुका राहाता तालुक्यात होणार आहेत.

गावपातळीवरील निवडणुका स्थानिक प्रश्नांवर होत असल्याने त्यात पक्षीय राजकारण फारसे नसते. पण विविध पक्षांच्या पाठबळावर प्रगती पॅनेल, जनसेवा पॅनेल, जनविकास पॅनेल...वा अशी गावाच्या ग्रामदैवताच्या नावाची पॅनेल्स रिंगणात असतात. निवडणूक निकालानंतर या पॅनेलमधील झुंज यशस्वी झाली तर गाव आमच्याच पक्षाच्या ताब्यात आले, अशी हाकाटी मोठे पक्ष पिटतात व गावा-गावातील आपली ताकद विरोधी पक्षांना दाखवून देतात. मागील निवडणुकांच्या काळात राज्यात भाजपचे सरकार होते व त्या सरकारने गावातून सरपंच निवडीचा कायदा केल्याने या पदावरून गावा-गावात मोठी रणधुमाळी झाली. मात्र, आताच्या महाविकास आघाडी सरकारने आता नव्या कायद्याने गावचा सरपंच ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांतून करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता १५ जानेवारीनंतर सरपंचपदासाठी सदस्य पळवापळवी व घोडेबाजार रंगणार आहेत.

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला. तसेच डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्रे) 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबरला होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत. 

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : 
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234. नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अशी-अकोले- ५२, संगमनेर-९४, कोपरगाव-२९, श्रीरामपूर-२७, राहाता-२५, राहुरी-४४, नेवासे-५९, नगर तालुका-५९, पारनेर-८८, पाथर्डी-७८, शेवगाव-४८, कर्जत-५६, जामखेड-४९ व श्रीगोंदे ५९. जिल्ह्यातील निवडणुका होणाऱ्या ७६७ ग्रामपंचायतींची प्रभाग संख्या २६५० असून, ७२३४ सदस्य यातून निवडून दिले जाणार आहेत. त्यामुळे एका जागेसाठी किमान ३ इच्छुक जरी हिशेबात धरले तरी जिल्ह्यातील २१-२२ हजार होतकरू राजकारणी कामाला लागले आहेत. येत्या दोन महिन्यात झोप उडाल्यागत त्यांची धावपळ सुरू राहणार आहेत. हजारो-लाखो रुपयांचा चुराडा यात होणार आहे. गावा-गावांतून पार्ट्यांना व भांडणांना आता ऊत येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post