राज्यभरात 'कारभारी-बिनविरोध'चा फंडा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोनामुळे मागील ८-९ महिन्यांपासून थंडावलेल्या राजकीय वातावरणाला ग्रामपंचायत निवडणुकांनी चैतन्य दिले असले तरी राज्यभरात 'ग्रामपंचायत बिनविरोध करा व विकास निधीचा लाभ घ्या', असा फंडा सर्वपक्षीय आमदारांकडून जाहीर केला जात असल्याने त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या बिनविरोध फंड्याबद्दल संमिश्र प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. काहीजणांकडून या बिनविरोध निवडणुकांचे स्वागत करण्यात येत आहे तर काहीजणांकडून अशा निवडणुकांमुळे स्पर्धा होत नाही व गावकऱ्यांना आपले कारभारी निवडण्याचा हक्क मिळत नाही, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता २३ ते ३० डिसेंबर या काळात उमेदवारी दाखल करण्याची मुदत असल्याने या काळात किती उमेदवारी अर्ज दाखल होतात व त्यानंतर किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर गावागावांत तंटे वाढतात आणि कटुता येते असे कारण देत विदर्भ-मराठवाड्यासह राज्यभरातील विविध ठिकाणच्या आमदारांनी बिनविरोध ग्रामपंचायत काढण्यासाठी निधीचे आमिष दाखवायला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने गावकारभाऱ्यांना प्रलोभन दाखवले जात आहे. कोणी ५० लाख तर कोणी २५ लाखांचा विकास निधी जाहीर करून स्वत:ला प्रसिद्धीझोतात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कटुता वाढते म्हणून आमदारांनी निधी सूत्राचा वापर करण्याच्या घोषणा केल्या आहेत. मात्र, केवळ निधी मिळाल्याने निवडणुका घेऊ नका असे आवाहन करण्यातून लोकशाहीचा मूळ आत्मा हरविल्याची टीका आता होऊ लागली आहे. निधीची घोषणा करून निवडणुका टाळण्याचा हा फंडा अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे. केवळ निवडणुकांमुळे कटुता निर्माण होत असेल तर नगरपालिका व महापालिकांचे वॉर्ड तसेच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांमध्येही ती दिसून येते. केवळ ग्रामपंचायत स्तरावर निवडणुकाऐवजी सदस्य बिनविरोध निवडण्यासाठी निधीचे आमिष दाखविले जात आहे, असेही काही सदस्यांचे म्हणणे आहे.

काहींकडून स्वागत

गावातील जुन्या पिढीने सामंजस्याने निवडणुका लढवायला हव्यात. जुन्या व्यक्तींना काहीच कळत नाही असे न म्हणता समन्वयाने काम करायला हवे, असे आवाहन काहीजणांकडून होत आहे. तर, बिनविरोध निवडणुकांच्या काही चांगल्या बाबी आहेत. या निवडणुका पक्षीय चिन्हावर नसतात. त्यामुळे निधी मिळवून गावाचा विकास करणारी मंडळी आली तर चांगलेच असते. कारण, अलिकडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दारूचा वापर वाढला आहे. त्यामुळे असे पर्याय आमदारांनी दिले असतील. पण त्याचे तोटे असे की, स्पर्धा न होताच सदस्य निवडले जातात. त्यामुळे कटुता निर्माण न होता निवडणुका करण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न व्हायला हवेतच, असे मतही व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post