महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; खलिस्तानी झेंड्यानं झाकला चेहरा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कृषी कायद्यावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्यानं महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशाबाहेरूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र, वॉशिग्टनमध्ये कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या काही खलिस्तानी समर्थक आंदोलकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. वॉशिग्टनमधील भारतीय दूतावासासमोरील महात्मा गांधी मेमोरियल प्लाझासमोर असलेल्या गांधी पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. खलिस्तानी घटकांनी खलिस्तानी झेंडा पुतळ्यावर टाकत चेहरा झाकून टाकला.

भारतीय दूतावासाकडून या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेचा दूतावासाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. शांती व न्यायाचं प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असं दूतावासानं म्हटलं आहे. दूतावासानं अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

शेतकरी आज दिल्लीत धडकणार?
नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन केलं जाणार आहे. राजस्थानातील शहाजहाँपूर येथून हजारो शेतकरी जयपूर- दिल्ली महामार्गावरून रविवारी सकाळी ११ वाजता ‘दिल्ली चलो’ आंदोलनास सुरुवात करतील, असे शेतकरी नेते कंवलप्रीतसिंग पन्नू यांनी सिंघू सीमेवर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र, सरकार शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करू देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post