गागरेंच्या रुपाने तनपुरे-कर्डिले संघर्ष? म्हैसगावच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव ग्रामसभेला मान्य आहे की नाही, याचा फैसला बुधवारी (२ डिसेंबर) ग्रामस्थांच्या मतदानातून होणार आहे. मात्र, यानिमित्ताने राहुरी तालुक्याचे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या संघर्षात नेमकी सरशी कोणाची होणार, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. मंत्री तनपुरेंनी म्हैसगावमधील आपल्या समर्थकांमार्फत गागरे यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे व दुसरीकडे कर्डिलेंनीही गावातील आपल्या समर्थकांमार्फत गागरे यांच्याविरोधात मतदान होण्यासाठी फिल्डींग लावली आहे. दरम्यान, लोकनियुक्त सरपंचाचे भवितव्य ग्रामसभेसारख्या गावपातळीवरील सर्वोच्च संस्थेद्वारे ठरवण्याची राज्यातील पहिलीच घटना ऐतिहासिक ठरणार आहे.

भाजपच्या मागील सत्ताकाळात ग्रामस्थांतून सरपंच निवडीच्या निवडणुकीत गागरे म्हैसगावचे सरपंच झाले आहेत. पण ग्रामपंचायतीच्या अन्य ९ सदस्यांमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अवघे २जण व विरोधी भाजपचे ७जण निवडून आले होते. भाजपच्या ७जणांपैकी दोनजणांचे सदस्यत्व नंतर जातपडताळणी दाखला व अतिक्रमण कारणांमुळे रद्द झाले. पण नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर ग्रामस्थांतून सरपंच निवडीचा कायदा रद्द केला व पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांतून निवडीचा नवा कायदा केला. त्यामुळे म्हैसगावच्या सरपंच गागरेंवर भाजप समर्थक ५ सदस्यांनी अविश्वास आणला तसेच सरपंचाच्या पक्षाचा एक सदस्यही आपल्याकडे खेचून घेतला. यामुळे गागरेंविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला. पण नंतर ग्रामविकास मंत्रालयाने लोकनियुक्त सरपंचावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेची मंजुरी आहे की नाही, हे स्पष्ट होईपर्यंत त्यांचे सरपंचपद कायम राहील, असे स्पष्ट केल्याने गागरेंना सरपंचपद पुन्हा मिळाले. पण आता त्यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मान्य आहे की अमान्य, हे जाणून घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. २ डिसेंबरला सकाळी ९ वाजता म्हैसगावला ही ग्रामसभा होणार आहे. यासाठी राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आवश्यक तयारी केली आहे. ३५ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. गावातील शाळेत असलेल्या दोन मतदान केंद्रावर २३०० मतदार मतदान करणार आहेत. त्यांना अविश्वास ठरावाशी सहमत वा अविश्वास ठरावाशी असहमत अशी मते द्यावी लागणार आहेत. गागरे समर्थक व विरोधकांनी मागील दोन दिवसांपासून गावातील घराघरात जाऊन मतदारांना आपल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता म्हैसगावचे ग्रामस्थ आपणच निवडून दिलेल्या गागरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त करतात की, विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मान्य करतात, याकडे जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post