ग्रामसभेने केले लोकनियुक्त सरपंचाला पायउतार; म्हैसगावच्या राजकीय संघर्षात कर्डिलेनी दिली मंत्री तनपुरेंना मात


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांना बुधवारी ग्रामसभेने पायउतार केले. ग्रामपंचायत सदस्यांनी गागरे यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामसभेने ११६ मताधिक्य देऊन मान्य केला. त्यामुळे गागरे यांचे सरपंचपद रद्द झाले असून, त्यांच्या सरपंचपदाचा पदभार उपसरपंच सागर दुधाट यांच्याकडे देण्यात आला आहे. गागरे यांच्या रुपाने राहुरी तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यातील वर्चस्वाचा संघर्ष सुरू होता व त्यात अखेर कर्डिले यांनी मंत्री तनपुरेंवर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजप सत्तेच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत अडीच वर्षांपूर्वी महेश गागरे ९१५ मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी १८६० मतदान झाले होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या अन्य ९ सदस्यांपैकी ६जणांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. पण गागरे हे लोकनियुक्त सरपंच असल्याने त्यांच्यावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेची मान्यता घेण्याचे आदेश ग्रामविकास खात्याने दिले होते. त्यानुसार राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी बुधवारी ग्रामसभा घेतली व त्यातील मतदारांचे मतदान घेतले. २२७७ मतदारांपैकी १४७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी ७५६ जणांनी गागरे यांच्यावर दाखल असलेल्या अविश्वास ठरावाला सहमती दर्शवली तर ६४०जणांनी असहमती दाखवली. परिणामी ११६जणांची जास्त सहमती अविश्वास ठरावाच्या बाजूने असल्याने गागरे यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले. या निवडणुकीत ८३ मते बाद झाली. जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या आगळ्यावेगळ्या ग्रामसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, गागरे हे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री तनपुरे यांचे समर्थक आहेत. पण लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले तेव्हा त्यांच्या पक्षाचे समर्थक अवघे दोन सदस्य त्यांच्यासमवेत होते. तर विरोधी भाजपचे माजी आमदार कर्डिले समर्थक ५जण होते व त्यांनी एका गागरे समर्थकालाही फोडले होते. त्यामुळेच गागरे यांच्यावरील अविश्वास ठराव ६ विरुद्ध २ अशा फरकाने मंजूर झाला होता. व याच अविश्वास ठरावावर बुधवारी ग्रामसभेनेही शिक्कामोर्तब करून गागरेंना अधिकृतपणे सरपंचपदावरून हटवले. आता ग्रामपंचायत सदस्यांतून नव्या सरपंच निवडीपर्यंत उपसरपंच दुधाट यांच्याकडे सरपंचपदाचा पदभार देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post