कृषी कायद्यावरुन खासदार सुजय विखेंचा मंत्री थोरातांना टोला


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'केंद्राने केलेले कृषी कायदे जर शेतकऱ्यांना अन्यायकारक वाटत असले असते, तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले असते. फक्त आता महाराष्ट्रामध्ये आपले मंत्रिपद टिकवण्यासाठी किंवा विरोधाला विरोध करण्यासाठी काहीजण या कायद्यांविरोधात बोलू लागले आहे', असा दावा नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी केला. 'जर खरेच कायदे चुकीचे असते तर अगोदर 'त्यांनी' संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करून दाखवली असती', असा टोला त्यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

नगरच्या भाजप कार्यालयातील कार्यक्रमानिमित्त आलेल्या डॉ. विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, दोन्ही काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, 'केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेले कायदे योग्य आहे. जर ते कायदे योग्य नसते तर महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा रस्त्यावर उतरले असते. आज विरोधी पक्ष फक्त विरोध करायचा म्हणून करीत आहे', असा दावा करून ते पुढे म्हणाले, 'दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. केंद्र सरकार यामध्ये लक्ष घालत आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात बोलणे चालू आहे. मात्र आता तेथील शेतकऱ्यांचे आंदोलन दुसऱ्यांच्या हातात गेले आहे. त्यामुळे ती परिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची, यासाठी सरकार आंदोलककर्त्यांशी चर्चा करीत आहे. केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या कायद्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच त्यातून मार्ग निघेल,' असे सांगून ते म्हणाले, 'ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कायद्याला विरोध केलेला नाही', असाही दावा त्यांनी केला.

'ती' निर्यात बंदी हटेल
कांद्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मागणी होती ती निर्यात बंदी उठवण्याची. आता कांद्याचे दर घसरलेले आहे. त्यामुळे निर्यात बंदीसाठी आम्ही निश्चितपणे चर्चा करणार आहोत. जानेवारीमध्ये निर्यातबंदी हटवली जाईल, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post