अबब.. 'मुळा'मध्ये ३ दशलक्ष फूट गाळ; पाणी साठवण क्षमता झाली कमी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

उत्तर नगर जिल्ह्यातील राहुरी, नगर शहर व एमआयडीसी, भिंगार, नेवासे, शेवगाव, पारनेर एमआयडीसी या भागाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता तब्बल ३ दशलक्ष घनफुटने कमी झाली आहे व त्याचे कारण आहे. मागील ४८ वर्षात या धरणात साठलेला गाळ. यामुळे या धरणाची पाणी साठवण क्षमता जरी २६ दशलक्ष घनफुटाची असली तरी प्रत्यक्षात त्यात २३ दशलक्ष घनफुटच पाणी साठवता येते व बाकीचे ३ दशलक्ष घनफुट पाणी जिल्ह्याची गरज असतानाही साठवता येत नसल्याने मुळा नदीपात्रात सोडून द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मुळा धरणातील गाळ काढण्याचा विचार सुरू केला आहे. हा गाळ काढून शेतकऱ्यांना दिला तर किमान ५०० कोटींचा महसूल शासनाला मिळणार आहे.

राज्यातील मोठ्या धरणांतील गाळ, गाळ मिश्रीत वाळू (रेती) काढण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील पाटबंधारे विकास महामंडळातर्फे करावी व त्यामधून मिळणारा महसूल सिंचन प्रकल्पांच्या पुनर्स्थापना कामासाठी वापरण्याचा शासन निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या मेरी संस्थेने गाळ काढण्यासाठी निवड केलेल्या राज्यातील पाच धरणांमध्ये मुळा धरणाचा समावेश आहे. त्यानुसार, भाजप सरकारने मुळा धरणातील गाळ काढण्याची निविदा प्रक्रिया राबविली होती. परंतु, न्यायालयात याचिका दाखल झाल्याने त्यावेळी शासनाने निविदा प्रक्रिया रद्द केली. न्यायालयाने याबाबत निकाल दिला असून शासनास निविदा प्रक्रिया सुरू करण्यास अनुमती दिली आहे. मुळा धरणातून सध्या अकृषिक वापरासाठी (पिण्याच्या पाणी योजना व औद्योगिक वापर) ५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाष्पीभवनामुळे २ दशलक्ष घनफूट पाणी कमी होते. धरणाचा साडेचार दशलक्ष घनफूट मृत (अचल) जल साठा ठेवला जातो. त्यामुळे शेती सिंचनासाठी अवघे तेरा दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होत आहे. जलसंपदा विभागाच्या 'मेरी' या संस्थेने २००९ मध्ये सर्वेक्षण करून मुळा धरणात २.४० दशलक्ष घनफूट गाळ जमा झाल्याचा अहवाल दिला होता. या सर्वेक्षणास अकरा वर्षे झाली असल्याने आता अंदाजानुसार मुळा धरणात तीन दशलक्ष घनफूट गाळ असण्याची शक्यता आहे. तेवढी धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे २६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण आता २३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे झाले आहे. त्याचा फटका सिंचनाच्या पाण्याला बसत आहे.

समितीचा झाला निर्णय

मुळा धरणात १९७२ साली पाणी साठविण्यास सुरुवात झाली. धरणाचा मूळ आराखडा ३१ हजार ५०० दशलक्ष घनफूट क्षमतेचा होता. परंतु, धरण २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे करण्यात आले. धरणाचे पाणलोट क्षेत्र मोठे आहे. पावसाळ्यात धरणात पाणी जमा होताना माती, दगड-गोटे, रेती असे अनेक पदार्थ वाहून येतात. त्यामुळे, मागील ४८ वर्षात धरणाची साठवण क्षमता घटली. मुळा धरणातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे राहुरीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मागणी केली होती. त्यावर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जलसंपदा विभागाने समिती गठीत केली आहे. धरणातील एकूण गाळ व रेती किती आहे, याचा अहवाल तयार करण्यासाठी त्याचे नमुने गोळा करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुळा पाटबंधारे विभागाला दिले गेले आहेत. त्यानुसार धरणातील गाळ काढण्यासाठी प्रमाणित स्वरुपातील सुधारित प्रारूप निविदा काढली जाणार आहे. मुळा धरणातील रेती (वाळू) उत्खननातून जलसंपदा विभागास आजच्या दर सूचीनुसार ५०० कोटींचा महसूल मिळेल. धरणातून गाळ काढण्याचे काम पंधरा वर्षे काम चालेल असा अंदाज आहे. धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत दिल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल तसेच धरणाची साठवण क्षमता पूर्ववत होऊन सिंचनासाठी तीन दशलक्ष घनफूट जास्तीचे पाणी उपलब्ध होईल, ही बाब जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आणून दिल्यानंतर त्यांनीही धरणातील गाळ काढण्याच्या कामास अनुकूलता दाखवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post