नगर अर्बन बँक : समोरासमोर चर्चेला या; भाजप नेते दिलीप गांधींना पुन्हा आव्हान


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेत ३ कोटीचा अपहार झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिसात बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार दिलीप गांधींसह त्यांचे संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर काही गांधी समर्थकांनी त्याला आक्षेप घेऊन माजी अध्यक्ष दिलीप गांधींमुळेच बँकेची प्रगती झाली आहे, त्यामुळे बँकेची तातडीने निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. पण समर्थकांच्या या मागणीला बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी आव्हान दिले आहे. बँकेची निवडणूक व बँकेची प्रगती या दोन मुद्यांवर माजी अध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधी यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान राजेंद्र गांधी यांनी पुन्हा एकदा दिले आहे. 

माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले की, बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधी हे खुप मुरलेले राजकारणी आहेत. 'खोटे बोल पण रेटून बोल'मध्ये ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बँकेची प्रगती व बँकेची निवडणूक या दोन मुद्यांवर दिलीप गांधींनी माझ्याबरोबर एकत्र पत्रकार परिषद घ्यावी किंवा एखादे न्यूज चॅनेलवर लाईव्ह चर्चासत्रात सहभागी होण्याचे धैर्य दाखवावे. 

माजी अध्यक्ष गांधींनी बनविलेल्या बँकेच्या पोटनियमांविरुध्द राजेंद्र गांधी व राजेंद्र चोपडा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यासंबंधी अजून अंतिम निर्णय झालेला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केंद्रीय निबंधकांसमोर हे प्रकरण प्रलंबित असताना बँकेची निवडणूक होवूच शकत नाही. बँकेच्या वाढलेल्या तोट्यात व वाढलेल्या प्रचंड एनपीएमध्ये बँकेचा निवडणूक खर्च बँकेला झेपणार नाही. ही सत्य परिस्थिती माहीत असताना केवळ विषयांतर करण्यासाठी दिलीप गांधी स्वतःच्या मोजक्या व मूठभर समर्थकांमार्फत बँकेची निवडणूक घेण्यासाठी पत्रकबाजी करीत आहेत, असा दावा राजेंद्र गांधी यांनी केला आहे. 

बँकेची वसुली कशी होईल व बँकेच्या कमी झालेल्या ठेवी कशा वाढतील, हे पाहायचे सोडून केवळ निवडणूक घ्या म्हणणाऱ्या व्यक्तींची स्वार्थी प्रवृत्ती यातून स्पष्ट होत आहे. इतर राजकारणातील अस्तित्व पूर्ण संपल्यामुळे आता नगर अर्बन बँकेकडेच नजर लावून बसणारांना दुसरे काहीच कामही उरले नाही. उठसूठ नुसती पत्रकबाजी सुरू आहे. अर्थात तंबाखू खाल्ल्याने पचन होते व तंबाखू खाल्लेने मनुष्य शतायुषी होतो, अशी मुक्ताफळे उधाळणाऱ्या व्यक्तींकडून वेगळी काय अपेक्षा करणार, असा टोलाही माजी संचालक गांधींनी यानिमित्ताने लगावला आहे.

बँकेची मांडली अधोगती
माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी मागील सहा वर्षात बँकेच्या अधोगतीची आकडेवारीही मांडली आहे. ते म्हणाले, नगर अर्बन बँकेचे बडतर्फ चेअरमन दिलीप गांधी यांनी बँकेला मल्टीस्टेट दर्जा घेतल्यानंतर व या मल्टीस्टेट दर्जाचा गैरफायदा घेत बनविलेल्या पोटनियमांचे आधारे व पॅनेलला सहकार महर्षी ज्येष्ठ नेते (स्व.) सुवालालजी गुंदेचांचे नाव व चेहरा वापरून 2014 ची निवडणूक एकतर्फी जिंकल्यानंतर बँकेची दुर्दशा झाल्याचा दावाही 
त्यांनी केला आहे. त्यासाठी काही आकडेवारी राजेंद्र गांधी यांनी दिली आहे.

2014 अखेर बँकेच्या ठेवी होत्या 950 कोटी व आता 2020 अखेर बँकेच्या ठेवी आहेत 800 कोटी. 2014 अखेर बँकेचे कर्जदार होते 66000 व 2020 अखेर बँकेचे कर्जदार आहेत 40000. 2014 अखेर बँकेचा एनपीए होता 40 कोटी म्हणजे 4 ते 5% व 2020 अखेर बँकेचा एनपीए आहे साधारण 450 कोटी म्हणजे जवळपास 60 ते 65%. 2014 पर्यंत बँकेच्या सभासदांना नियमित लाभांश 15% मिळत होता, पण 2017 नंतर सभासदांना मिळणारा लाभांश बंद झाला. 2008 ते 2014 बँकेचे संचालक मंडळात अनेक अभ्यासू व बँकेतील भ्रष्टाचार थांबविण्याची धमक असलेल्या संचालकांचा समावेश असल्यामुळे या काळात बँकेची विक्रमी प्रगती होवून बँकेच्या 15 नवीन शाखा विस्तार झाला. तसेच बँकेला विक्रमी नफा होवून सभासदांना शताब्दी भेट देण्याच्या रक्कमेची पूर्ण तरतूद होवू शकली, असे स्पष्ट करून माजी संचालक गांधी यांनी पुढे सांगितले की, 2014 ला बँकेत दिलीप गांधीची सत्ता आल्यानंतर बँकेची प्रगति पूर्णपणे ठप्प झाली व 2014 नंतर बँकेची एकही नवीन शाखा वाढली नाही. या उलट 5 ते 6 शाखा भयंकर तोट्यात असल्यामुळे बंद कराव्या लागणार आहेत. 2014 नंतर बँकेचे खर्च अवाढव्य वाढले. यात संचालक मंडऴाचे भत्ते भरमसाठ वाढले. बँकेचा डिझेल व वाहनाचा खर्च अनेक पटीने वाढला. सुकामेवा, बुके, जाहिरात, फोटोग्राफर, नूतनीकरणाचे खर्चाचे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत. अशा अफाट खर्च व उधळपट्टीमुळे बँकेच्या सभासदांसाठी शताब्दी भेटीची एक रुपयांची देखील तरतूद या संचालकांना करता आली नाही. 2014 नंतर बँकेची प्रचंड अधोगती व सभासदांचे अतोनात व कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची वस्तुस्थिती व आकडेवारी असताना काही मोजकी लोचट मंडळी पत्रकबाजी करून 2014 नंतर दिलीप गांधींच्या चेअरमनपदाच्या काळात बँकेची खूप प्रगती झाल्याचा हास्यास्पद व खोटा दावा करतात, अशी टीकाही माजी संचालक गांधी यांनी केली. 

Post a Comment

Previous Post Next Post