नगर अर्बन बँक : होऊन जाऊ द्या साऱ्यांचीच 'नार्को'


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर अर्बन बँकेसंदर्भात नुकत्याच पोलिसात दाखल झालेल्या ३ कोटीच्या अपहाराच्या गुन्ह्यात सर्व संबंधितांचीच नार्को चाचणी करण्याची वेळ आता आली आहे. कारण, ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, त्यांच्या समर्थकांनी चौकशी अधिकाऱ्याच्या नार्को चाचणीची मागणी केली आहे व दुसरीकडे चौकशी अधिकाऱ्याने एकाच तक्रारीची चौकशी केली व दुसऱ्या तक्रारीची केलीच नाही, त्यामुळे त्यांचीही व त्यांच्यासमवेत बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचीही नार्को चाचणी करण्याची मागणी नगर अर्बन बचाव कृती समितीने केली आहे. दरम्यान, कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेला अपहाराचा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध ३ कोटीच्या अपहाराचा गुन्हा कोतवाली पोलिसात दाखल झाल्यानंतर, ज्या अहवालामुळे हा गुन्हा दाखल झाला, तो करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यांची नार्को करण्याची मागणी दिलीप गांधींच्या समर्थकांनी केली आहे. आता नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनीही तपास अधिकाऱ्यावर आक्षेप घेताना, त्यांनी (चौकशी अधिकारी) माझ्या एकाच तक्रारीची चौकशी केली आहे, दुसऱ्या तक्रारीची चौकशीच झालेली नाही. या चौकशी अधिकाऱ्यांसह बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचीही नार्को चाचणी केली जावी, अशी मागणी केली आहे. यामुळे नगर अर्बन बँकेतील अपहार चर्चेत आला आहे.

माजी संचालक गांधी यांचे म्हणणे आहे की, नार्को टेस्ट जरूर झाली पाहिजे, पण एकट्या तपासी अधिकाऱ्याची कशासाठी? तर बँकेचे चार वरिष्ठ अधिकारी व स्वतः दिलीप गांधी या सर्वांचीच नार्को टेस्ट व्हावी. म्हणजे नगर अर्बन बँकेची आजची झालेली अधोगती व बँकेत नेमका कुठे-कुठे भ्रष्टाचार झाला आहे, हे स्पष्ट होईल, असा त्यांचा दावा आहे.

'तपासी अधिकाऱ्याने बँकेतील विरोधी मंडळींशी संगनमत करून चुकीचा चौकशी अहवाल बनविला व त्यामुळे तपासी अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करावी, असे माजी अध्यक्ष गांधी समर्थकांची मागणी पोलिसांनी जरूर मान्य करावी', असे आवाहन करून माजी संचालक राजेंद्र गांधी म्हणाले, 'तपासी अधिकाऱ्याने टेरॉसॉफ्ट टेक्नोलॉजी या खात्यावर झालेल्या 'चिल्लर घोटाळ्याची' चौकशी करून अहवाल तयार केला व त्यानंतर पोलीस फिर्याद दाखल झाली. परंतु तपासी अधिकाऱ्यांनी खुद्द दिलीप गांधींचे खात्यावर झालेल्या 'चिल्लर घोटाळ्याची' चौकशी करणेचे टाळले आहे. त्यांना सर्व पुराव्यांसह तक्रार अर्ज दिलेला आहे व त्यानंतर अनेक स्मरणपत्रे दिली आहेत. परंतु ही चौकशी झालेलीच नाही. त्यामुळे बँकेत नेमके कोणाचे कोणाबरोबर संगनमत आहे व जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त घोटाळ्याची चौकशी होणे आवश्यक असताना फक्त 3 कोटीचीच चौकशी करण्यात आली. त्यामुळे बँकेतील अनेकांची नार्को करणे आवश्यक आहे.

'पत्रकबाजीतून विषयांतर करण्यापेक्षा दिलीप गांधींनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी व त्यात त्यांनी स्वतःची नार्को करण्याची तयारी दाखवावी', असे आव्हानही माजी संचालक गांधींनी दिले आहे.

गुन्हा झाला वर्ग
नगर अर्बन बँकेतील ३ कोटीच्या अपहाराचा कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेला गुन्हा आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा अपहाराचा गुन्हा असल्यामुळे कशा पद्धतीने अपहार झाला आहे व तो कोणी आणि कसा केला आहे यासह इतर माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग घेणार आहे. त्यामुळे आता अनेकांच्या चौकशा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post