मांसाहाराने हृदयविकाराचा धोका वाढतो?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

तांबडे मांस टाळणे व वनस्पतीजन्य आहाराचा अवलंब करणे हे हृदयविकार टाळण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. जर हे बदल केले तर पोटातील जीवाणूंचे हृदयावर होणारे अनिष्ट परिणाम टाळले जातात असेही सांगण्यात आले.

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या नियतकालिकात म्हटले आहे की, मानवी पचन संस्थेचा भाग असलेल्या आतड्यांमध्ये सूक्ष्म जीवाणूंचा समावेश असतो. ते आपल्या चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यात आहारातील पोषण द्रव्ये शोषून ऊर्जा वाढवणे व प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम जीवाणू करीत असतात. अमेरिकेतील तुलान विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार पोटातील जीवाणू जेव्हा प्राणीजन्य आहार पचवण्याच मदत करीत असतात, तेव्हा ट्रायमेथिलॅमाइन एन ऑक्साईड हे चयापचयक तयार होते व त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत असतो.

हा सगळा प्रकार विशेष करून जे लोक तांबडे मांस खातात त्यांच्या बाबतीत घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ज्या आहारात ते रसायन तयार होत नाही, असा शाकाहारी आहार सेवन करणे फायद्याचे ठरते. शाकाहारी अन्नाचे पचन होताना ट्रायमेथिलॅमाइन एन ऑक्साईड हे चयापचयक कमी प्रमाणात तयार होते. साधारण ३० ते ५५ वयोगटातील १,२१,७०१ लोकांची तपासणी यात करण्यात आली. त्यात ७६० महिलांचा समावेश होता. या सहभागी व्यक्तींची माहिती धूम्रपान, व्यायाम, भौगोलिक प्रदेश याबाबतही गोळा करण्यात आली. त्यानंतर त्यांचे रक्ताचे नमुनेही तपासण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील ट्रायमेथिलॅमाइन एन ऑक्साईड या रसायनाचे प्रमाण मोजण्यात आले. ज्यांच्यात ते प्रमाण जास्त होते, त्या महिलात हृदयविकाराची जोखीम ६७ टक्के जास्त दिसून आली.

Post a Comment

Previous Post Next Post