भाजपची जिरवेपर्यंत आम्ही एकत्र; मंत्री वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीलाही सूचक टोला


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसची यशस्वी वाटचाल सुरू आहे. नागपूरची जागा ५८ वर्षांनी आम्ही जिंकली आहे. पुण्यातही इतिहास घडवला आहे. यातून महाविकास आघाडी सरकारमध्ये अजिबात मतभेद नसल्याचे स्पष्ट होत आहे व भाजपची जिरवत नाही, तोपर्यंत आम्ही एकत्रच राहणार आहोत'', असा गौप्यस्फोट बहुजन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी येथे केला. दरम्यान, देशातील विरोधी पक्षांच्या नेतेपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाच्या होत असलेल्या चर्चेबद्दल बोलताना, 'ज्यांचा पक्ष मोठा त्यांचा नेता होऊ शकतो, ज्यांचा पक्ष छोटा त्यांचा होऊ शकत नाही', अशा सूचक शब्दात त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. देशातील विरोधी पक्षांचे नेतृत्व सोनिया गांधीच करतील, असा विश्वास व्यक्त करताना भाजप कुटील डाव खेळत माणसे फोडाफोडीचे राजकारण करते, अशी टीकाही त्यांनी केली.

नगर येथील ओबीसी मेळाव्यासाठी वडेट्टीवार आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ओबीसी मेळावा संयोजक व औरंगाबादचे नगरसेवक बाळासाहेब सानप, नगरमधील ओबीसी समाजाचे पदाधिकारी बाळासाहेब भुजबळ, हरिभाऊ डोळसे व अन्य उपस्थित होते. ''ओबीसी समाजाच्या विविध मागण्या आता पुढे येत आहेत. ब्रिटिश काळामध्ये १८३१मध्ये ओबीसी जनगणना झाली होती, त्यानंतर राज्य घटनेत आरक्षण मिळाले, पण आता ओबीसी समाजाची नव्याने जनगणना झाली पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी आहे. याशिवाय शासकीय नोकरीतील बँकलॉग भरावा, मागासवर्गीयांची पदोन्नती, बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळ, राज्य सेवा आयोगाद्वारे निवड होऊनही रखडलेल्या नियुक्त्या असे विविध विषय असून, यापैकी काही मार्गी लागले आहेत तर काहींसाठी आर्थिक तरतूद येत्या बजेटमध्ये मंजूर केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते खपवून घेणार नाही.. एक काहीतरी सांगा

''गायकवाड आयोगाने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे, दुर्दैवाने ते न्यायालयाच्या आदेशाने स्थगित झाले आहे. पण जेव्हा सुरू होते, तेव्हा त्याचे लाभ मिळाले आहेत. पण आता मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देण्याची मागणी म्हणजे राजकीय डाव व षडयंत्र आहे व ते आम्ही खपवून घेणार नाही'', असे स्पष्ट करून मंत्री वडेट्टीवार म्हणाले, ''दोन दिवसांपूर्वी मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आर्थिक दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस) आरक्षण दिले आहे. पण त्यावरही आक्षेप घेतला जात आहे. पण त्या सर्वांनी मिळून एक काहीतरी सांगितले पाहिजे ना'', असे स्पष्ट करून ते म्हणाले, ''मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याबद्दल कोणाचेही दुमत नाही. मात्र, त्यासाठी त्यांनी एकत्र आले पाहिजे. पण आज सगळे वेगवेगळे बोलत आहेत. त्यामुळे नेमके काय मांडायचे आहे ते अगोदर सांगा'', असे ते म्हणाले.

मेटे, त्यावर बोलायला लावू नका

''आमदार विनायक मेटे राजकारण करून मंत्री अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण समितीवरून हटवण्याची मागणी करून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान करीत आहे'', असा दावा करून वडेट्टीवार म्हणाले, ''शिवस्मारकासाठी तुम्ही (मेटे) काय योगदान दिले, त्या कामाच्या निविदांमध्ये काय घोळ आहे, हे आम्हाला बाहेर काढायला लावू नका'', असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आलेल्या इडीच्या नोटिसीबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ''राजकारणात आता बदलाची भावना वाढत आहे. पूर्वी मतभेद असायचे, आता मनभेद वाढत आहेत व बदला घेण्याची वाढत असलेली भावना लोकशाहीला पोषक नाही. भाजप याचा जास्त वापर करीत आहेत. आज ते सत्तेत आहेत, पण ही प्रथा भविष्यात त्यांनाच अडचणीत आणेल. आज ते इडी लावून उड्या मारीत असतील, पण लोक चिडले तर इडीला लोक विडी समजून फुंकतील', अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post