'ओबीसीं'चे नगरला होणार शक्तीप्रदर्शन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता 'ओबीसीं'मधून त्यांना आरक्षण देण्याची चर्चा होत आहे व या चर्चेला तसेच अशा आरक्षणाला ओबीसी नेत्यांकडून जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २३ रोजी ओबीसींचा राज्यव्यापी मेळावा नगरला होणार आहे आणि त्यात मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्य़ाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्राधान्याने चर्चा होऊन ओबीसींचे राज्यस्तरीय नेते यात भूमिका स्पष्ट करणार आहेत. य़ा मेळाव्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे.

राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी,व्हीजे, एनटी जनमोर्चाच्यावतीने शनिवारी (26 डिसेंबर) नगर शहरात ओबीसींचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी संघटनेचे राज्य नेते व जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नियोजनाची बैठक नुकतीच येथील नक्षत्र लॉन येथे घेतली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर भगवान फुलसौंदर होते. यावेळी बोलताना सानप यांनी, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करु नये, अशी मागणी केली. ते म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास ओबीसीचा विरोध नाही. पण, ओबीसीत त्यांचा समावेश नको. असे झाल्यास 382 जातींचा समुह म्हणजे पूर्ण ओबीसी समाज कायमचा वंचित राहील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

या बैठकीत प्रारंभी हरिभाऊ डोळसे यांनी स्वागत केले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे, राजेंद्र पडोळे, चंद्रकांत फुलारी, परवेझ शेख, सुवर्णकार संघटनेचे प्रकाश लोळगे, बारा बलुतेदार संघटनेचे माऊली गायकवाड, ट्रान्सपोर्ट संघटनेचे बाबा सानप, नगर सलून असोसिएशनचे अध्यक्ष अनिल निकम, नाभिक महिला अध्यक्षा वनिता बिडवे, गुरव समाजाच्या वनिता गुरव, वंजारी समाजाचे बंटी डापसे, गवळी समाजाचे मिसाळ सर, माळी समाजाचे बाळासाहेब भुजबळ, बारा बलुतेदारचे कार्याध्यक्ष संजय सैंदर, सुवर्णकार संघटनेचे विशाल वालकर, निलेश पवळे, नईम शेख, अनिल इवळे, पत्रकार किरण बोरुडे, वंचित संघटनेचे प्रतीक बारसे, परेश लोखंडे, डॉ.श्रीकांत चेमटे, दीपक कावळे, श्रीपाद वाघमारे, शाम औटी, राजेंद्र भगत, भाऊसाहेब घरवाढवे, वृत्तछायाचित्रकार अमोल भांबरकर, संजय आव्हाड उपस्थित होते. ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनीही यावेळी आरक्षण सद्यस्थिती, सरकार निर्णय आणि ओबीसी समाजावरील अन्यायाचे सविस्तर विश्लेषण केले. 

दरम्य़ान, एकूण लोकसंख्येत ओबीसी 52 टक्के संख्येने असून, आजही ते उपेक्षित आहे. त्यात मराठा समाजाचा समावेश होतो का, या भीतीने ओबीसी आता जागे झाले आहे. त्य़ामुळे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी राज्यात नगरसह 15 ठिकाणी मेळावे आयोजित केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post