मुलांमध्ये लठ्ठपणा येण्याचं कारण..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ज्या मुलांच्या पचनमार्गात अनारोग्यदायी जिवाणू असतात, त्या मुलांमध्ये लठ्ठपणाची तसेच स्त्री-पुरुष संप्रेरकांचा असमतोल निर्माण होण्याची (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) जोखीम तुलनेत अधिक असते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ (पीसीओएस)चे प्रमुख लक्षण म्हणजे ही व्याधी जडलेल्या महिलेच्या रक्तात पुरुष संप्रेरक टेस्टोस्टेरॉनची पातळी ही प्रमाणापेक्षा अत्यधिक असते. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येणे, केसांची अनावश्यक वाढ, मासिक पाळीत अनियमितता या समस्या उद्भवू शकतात.

जागतिक पातळीवर विचार केल्यास प्रजननक्षम वयातील सहा ते १८ टक्के स्त्रियांमध्ये ही समस्या आढळून येते. याविषयीचा अभ्यास ‘जर्नल ऑफ क्लिनिकल इन्डोक्रिनोलॉजी अ‍ॅण्ड मेटाबोलिझम’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ जडलेल्या महिला आणि किशोरवयीन मुलींमध्ये वंध्यत्व आणि मासिक पाळीतील अनियमिततेशिवाय इतर काही दुष्परिणामही दिसून येतात. यात चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक आजारांचाही समावेश होतो. प्रजननक्षम वय संपून गेल्यानंतरही ही मानसिक समस्या कायम राहू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

या अभ्यासाचे सहलेखक आणि अमेरिकेतील ‘चिल्ड्रन्स हॉस्पिटल, कोलोरॅडो’चे मेलानी क्री ग्रीन सांगतात की, लठ्ठपणा आणि पीसीओएस यांची समस्या असलेल्या किशोरवयीन मुलांच्या पचनमार्गातील जिवाणूंची त्यांच्या विष्ठेच्या नमुन्यातून तपासणी केली असता, अशी समस्या नसलेल्या मुलांच्या पचनमार्गाच्या तुलनेत त्यांच्यामध्ये हानीकारक जिवाणूंचे प्रमाण हे अधिक आढळून आले.’

या अनारोग्यदायी जिवाणूंचा आणि टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाच्या अधिक घनतेचा, तसेच चयापचयात्मक बिघाडांचा संबंध असल्याचे दिसून आले, असे ग्रीन यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post