शिक्षकांनी वाटले पेढे.. जुन्या पेन्शन योजनेचा मिळणार लाभ


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा ठरणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द करण्यात आल्याच्या निर्णयाचे शिक्षकांनी पेढे वाटून स्वागत केले. राज्यातील सर्व 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा ठरणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सही केली. ही माहिती मिळताच या निर्णयाचे स्वागत करीत जुनी पेन्शन कोअर कमिटीच्यावतीने सावेडी नाका चौकात पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, क्रीडा महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, रमाकांत दरेकर, बद्रीनाथ शिंदे, बाबासाहेब शिंदे, आनंदा नरसाळे, शिवाजी घाडगे, विठ्ठल काळे, नवनाथ घुले, बबनराव शिंदे, चंद्रकांत डाके, अनिल गायकवाड, भाऊसाहेब जिवडे, जयश्री देशपांडे, मुरलीधर मेहेत्रे, कांचन मिरपगार आदी शिक्षक उपस्थित होते.

10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त हजारो मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार संकटात येणार होता. मात्र, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ही अधिसूचना रद्द करीत असल्याचे सांगितले आहे. मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांसोबत शिक्षक, पदवीधर आमदार यांची बैठक पार झाली व त्यात हा निर्णय झाला. हा अडथळा दूर झाला असल्याने ज्यांची मूळ नेमणूक दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची आहे, त्या सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने आता विनाविलंब, विनाअट कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा ठरणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द होण्यासाठी जुनी पेन्शन कोअर कमिटीच्यावतीने संगीताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी आंदोलने करुन शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडली. तर आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार जयंत आसगावकर, आमदार अभिजित वंजारी, प्रधान सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आदींनी विशेष सहकार्य केल्याने या सर्वांचे शिक्षकांच्यावतीने आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post