रात्रीची जास्त झोप घेतल्यास पक्षाघाताचा धोका


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जे लोक नऊ तासांच्या पेक्षा अधिक रात्रीची झोप घेतात त्यांना पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते असे एका संशोधनात म्हटले आहे. कमी झोप असणे हे जसे धोक्याचे तसे जास्त झोपही धोक्याचीच असते. जे लोक रात्रीची झोप सात तास किंवा आठ तासांपेक्षा कमी घेतात त्यांच्यात पक्षाघाताचे प्रमाण जास्त असते. जास्त झोपेने पक्षाघाताचे प्रमाण २३ टक्के वाढते असे दिसून आले आहे. जास्त काळाची वामकुक्षीही आरोग्यास अपायकारक असते. जे लोक दुपारची वामकुक्षी ९० मिनिटांपेक्षा अधिक काळ घेतात त्यांना नंतर पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता २५ टक्के जास्त असते. जे लोक तीस मिनिटे वामकुक्षी घेतात त्यांना हा धोका कमी असतो.

जे लोक ३१ मिनिटे ते १ तास वामकुक्षी घेतात त्यांना पक्षाघाताचा धोका हा १ ते ३० मिनिटे वामकुक्षी घेतात त्यांच्या तुलनेत पक्षाघाताचा धोका फारसा संभवतो असे नाही. असे असले तरी पक्षाघात व वामकुक्षी तसेच पक्षाघात व रात्रीच्या झोपेचा कालावधी यावर अजून संशोधनाची गरज आहे. दिवसा मोठय़ा प्रमाणात झोप घेणे किंवा रात्री जास्त झोपणे या दोन्ही परिस्थितीत पक्षाघाताचा धोका असतो. आधीच्या संशोधनात असे दिसून आले होते की, जे लोक रात्री जास्त झोपतात किंवा दुपारी वामकुक्षी जास्त काळ घेतात त्यांच्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते व त्यांचा कमरेचा घेरही वाढतो.

या दोन्ही गोष्टी धोकादायकच आहेत असे चीनमधील वुहानच्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे शिओमीन झँग यांनी म्हटले आहे. रात्री जास्त काळ झोपणे किंवा दिवसा वामकुक्षी जास्त काळ घेणे हे दोन्ही घटक जोखमीचे असल्याचे चीनमधील ३१७५० व्यक्तींवर करण्यात आलेल्या प्रयोगात दिसून आले आहे, असे सांगून ते म्हणाले की, यात केवळ पक्षाघात हा एकच धोका नाही तर आरोग्याच्या इतर अनेक समस्या या अनियमित जीवनशैलीने निर्माण होतात. या लोकांपैकी १५५७ जणांना पक्षाघात झाला नंतर त्यांची माहिती घेतली असता त्यांच्यातील ज्या लोकांनी सहा वर्षांच्या काळात जास्त काळ वामकुक्षी केली किंवा रात्रीची झोप जास्त घेतली त्यांच्यात पक्षाघाताचे प्रमाण इतरांच्या तुलनेत ८५ टक्के असते.

Post a Comment

Previous Post Next Post