पाशाभाईंचे मिशन बांबू लागवड.. पृथ्वी रक्षण चळवळ सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ कृषी अभ्यासक पाशाभाई पटेल यांनी आता मिशन बांबू लागवड चळवळ हाती घेतली आहे. बांबूमुळे कार्बन उत्सर्जन ३० टक्के रोखले जाते व त्याचा पर्यावरण रक्षणासाठी फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी बाबू लागवड करून पर्यावरण रक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. बांबूंचा उपयोग आता बांधकामांपासून इंटेरियर डेकोरेशनसाठीही होत असल्याने भविष्यात बांबूला मागणी वाढणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पृथ्वीचे तापमान दीड डिग्री वाढले असल्याने ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यावर जगातील दोनशे देशांचे एकमत झाले आहे. इंग्लंडमध्ये २०३०नंतर पेट्रोल-डिझेलवरच्या गाड्या बंद केल्या जाणार आहेत, भारतातही २०२७पर्यंत अशा गाड्या बंद करण्याचे नियोजन आहे, कोळशापासूनची वीज निर्मितीही बंद केली जाणार आहे, अशा स्थितीत पृथ्वीचे तापमान संतुलित राखण्यासाठी ऑक्सिजन वाढणे व कार्बन उत्सर्जन रोखणे गरजेचे आहे. यासाठी वृक्षारोपण चळवळीप्रमाणे पृथ्वी रक्षण-बाबू लागवड चळवळ हाती घेतल्याचे सांगून पाशाभाई म्हणाले, बांबूचा उपयोग बांधकामात सुरू झाला असून इथेनॉल निर्मिती, सीएनजी गॅस निर्मिती, फर्निचर, कापड, सॉक्स, एवढेच नव्हे तर बिस्कीट, तांदूळ, लोणचेसारखे खाद्यपदार्थही होत आहे. बांबू लागवडीसाठी केंद्र सरकारने नॅशनल बांबू मिशन, अटल बांबू मिशन योजनांद्वारे रोहयो व सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. बांबू लागवडीला अनुदानही मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

बांबू लागवड वाढीसाठी पृथ्वी रक्षण रेडिओ लातूरला सुरू केला असून, यावर बांबू लागवडीची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जात आहे. लवकरच तेथे अटल बांबू डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजही सुरू केले जाणार आहे तसेच नव्या वर्षात राज्यातील सर्व नद्यांच्या काठी बांबू लागवड मिशन हाती घेतले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. बांबूंच्या सोळाशेवर जाती असल्या तरी बलकोवा, टुलडा, माणगा, मानवेल, वल्गारिस ग्रीन, अॅस्पर व कटांग या सातपैकी कोणत्याही जातीच्या बांबूंची लागवड फायदेशीर ठरते, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, कर्जत येथील शेतकरी किरण पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post