सावधान! टी बॅग आरोग्यासाठी धोकादायक?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

चहा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या चहा पिशव्या (टी बॅग) आरोग्यासाठी जोखमीच्या ठरू शकतात. कपातील गरम पाण्यात अथवा दुधात या चहाच्या पिशव्या बुडविल्या जातात. त्यामुळे लक्षावधी सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म आकाराचे प्लास्टिकचे कण अशा गरमागरम चहामध्ये मिसळू शकतात, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

चहाद्वारे पोटात गेलेल्या अशा प्लास्टिकच्या सूक्ष्म-अतिसूक्ष्म कणांचे आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम सध्या तरी स्पष्टपणे माहीत झालेले नाहीत, असे या अभ्यासात नमूद केले आहे.

जसजसा कालावधी उलटत जातो, तसतसे प्लास्टिकचे सूक्ष्म अशा कणांमध्ये विघटन होत जाते. पुढे त्यापेक्षाही लहान अशा नॅनो आकाराच्या कणांमध्ये ते विघटित होते. हे कण शंभर नॅनोमीटरपेक्षाही कमी आकाराचे असतात.

कॅनडामधील मॅकगिल विद्यापीठातील संशोधकांनी पर्यावरणात, जलचरांमध्ये आणि अन्नाच्या साखळीत आढळून येणाऱ्या प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचे अस्तित्व लक्षात आणून दिले आहे; परंतु प्लास्टिकचे हे सूक्ष्म कण मानवाच्या प्रकृतीला हानीकारक आहेत की नाही, याबाबत त्यांना अद्याप कोणताही निष्कर्ष काढता आलेला नाही. चहा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या चहा पिशव्यांतून असे सूक्ष्म आणि नॅनो आकाराचे प्लास्टिक कण चहामध्ये मिसळतात काय, असा प्रश्न नाथाली टुफेन्क्जी आणि अन्य संशोधकांना पडला. अशा कणांचा डाफ्निया मॅग्ना किंवा वॉटर फ्लीज (पाणी पिसू) अशा जलचर प्राण्यांवर काही परिणाम होतो काय, हे तपासून पाहिले. पर्यावरणविषयक अभ्यासात हे प्राणी नेहमीच एक प्रतिमान म्हणून वापरले जातात. संशोधकांनी चार वेगवेगळ्या उत्पादकांच्या चहाच्या पिशव्या कापून त्यातील चहा काढून घेतला. त्यानंतर या रिकाम्या प्लास्टिक पिशव्या एका भांडय़ातील गरम पाण्यात सोडण्यात आल्या. चहा तयार करण्याच्या तापमानाइतके या पाण्याचे तापमान होते. या पाण्याची इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली असता, एका प्लास्टिक चहा पिशवीपासून प्लास्टिकचे ११६० कोटी सूक्ष्म कण आणि ३१० कोटी नॅनो कण विलग झाल्याचे दिसून आले. यापूर्वी अन्नपदार्थात आढळून आलेल्या प्लास्टिक कणांच्या तुलनेत हे प्रमाण काही हजार पटींनी अधिक आहे.

दुसऱ्या प्रयोगात या प्लास्टिक कणांचा पाणी पिसूंच्या शरीरावर आणि वर्तणुकीवर परिणाम दिसून आल्याचे या संशोधकांनी सांगितले. मानवाच्या आरोग्यावर असे काही परिणाम होतात काय, यावर अभ्यास होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post