काँग्रेस करील बंड.. ठाकरे सरकार होईल..; आठवलेंनी कवितेतून साधला निशाणा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'जेव्हा काँग्रेस पक्ष करील बंड...तेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार पडेल थंड...महाराष्ट्रात लवकरच होईल या सरकारमध्ये बिघाडी...सत्तेतून जाणार महाविकास आघाडी'....अशा कवितेतून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचे भाकीत वर्तवले. 

निमित्त होते देशातील विरोधी पक्षांच्या म्हणजे-युपीएच्या अध्यक्ष सध्या सोनिया गांधी यांच्याजागी शरद पवार यांच्या निवडीची मागणी शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केल्याच्या वृत्ताचे. आठवलेंनी कविता करण्याआधी या नियुक्तीच्या चर्चेवर भाष्य केले. 'पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. त्यामुळे सोनियांच्या जागी पवारांच्या नियुक्तीची मागणी शिवसेनेने केल्याने राज्यातील महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडून काँग्रेस या सरकारचा पाठिंबा काढून घेऊन हे सरकार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने गंभीरपणे हा विषय घ्यायला हवा व स्वाभिमान असेल तर वेळोवेळी होत असलेला अपमान पाहून या सरकारचा पाठिंबा काढायला हवा व ते तो काढतील', असा दावाही आठवलेंनी आवर्जून केला.

शिर्डीतील कार्यक्रमानंतर सोमवारी रात्री केंद्रीय मंत्री आठवले यांनी नगर शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यानिमित्त शासकीय विश्रामगृहावर ते आले असताना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे व शहराध्यक्ष अजय साळवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना, 'काँग्रेसने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला तर भाजप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा सरकार स्थापन करेल. आमच्याकडे ११२ आमदार आहेत व नव्याने कोणालाही निवडणुका नको असल्याने कोणत्याही पक्षातील ३३जण आम्हाला पाठिंबा देतील व महायुतीचे सरकार राज्यात येईल', असा दावाही केला.

..तर, संविधान व लोकशाहीला धोका
नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी दिल्लीच्या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी करीत असले तरी ही मागणी मान्य होणे अशक्य आहे. कायद्यात दुरुस्ती सरकार करू शकते व तशी तयारीही आतापर्यंत दाखवली आहे. पण त्यांची मागणी कायदे रद्द करण्याचीच आहे, पण अशा पद्धतीने हे कायदे रद्द केले तर यापुढे प्रत्येक कायदा अशाच पद्धतीने रद्द करण्याची मागणी होईल. यामुळे संसदेला व लोकशाहीला काहीही अर्थ राहणार नाही व तो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला व त्याने रुजवलेल्या लोकशाहीला धोका ठरेल, असे स्पष्ट करून आठवले म्हणाले, या कायद्यांमुळे बाजार समित्या राहणार नाहीत, शेतकऱ्यांच्या जमिनी कंपन्यांकडे जातील, शेतमालाचे पैसे वेळेवर मिळणार नाहीत, असा चुकीचा प्रचार आंदोलक शेतकऱ्यांचे नेते करीत आहेत. या प्रचारात काहीही तथ्य नाही. कंपन्यांशी फक्त शेतमालाचे काँट्रक्ट होणार आहे, बाजार समित्यांनी शेतमालाचा भाव दिला तर त्यांचेही अस्तित्व राहणार आहे, शेतमालाचे पैसे वेळेवर देण्याचे बंधन कंपन्यांवर असून, ते दिले नाही तर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे विरोधाला विरोध सुरू आहे. आंदोलनात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूला त्यांचे नेतेच जबाबदार आहेत, असा दावा करून आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठे परदेश दौऱ्यावर गेल्यावर त्यांच्या या दौऱ्यांना आक्षेप घेणारे राहुल गांधी आता इटलीला चालले आहेत, शेतकरी थंडीत करीत असलेल्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला असताना राहुल गांधी इटलीला जात असल्याने त्याबाबत आम्हीही प्रश्न उपस्थित करू शकतो, असे सांगून ते म्हणाले, कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, पण त्यातील त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात. आंदोलनकर्त्यांनीही दोन पावले मागे आले पाहिजे. आंदोलने आम्हीही केली आहेत. विद्यापीठ नामांतरासाठी १७ वर्षे आंदोलन केल्यावर आम्हीही तडजोड केली व मराठवाडा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात समाविष्ट होऊ दिला. शिवाय शेतकऱ्यांचे सुरू असलेले हे आंदोलन पंजाब व हरियाणापुरतेच मर्यादित आहे व महाराष्ट्रातील राजू शेट्टी व बच्चू कडू यांनीही निवडक शेतकऱ्यांसह राजकीय हेतूने तेथे भेट दिली आहे, असा दावाही केला.

..तर, इडीची शिडी नेईल जेलमध्ये...
महाराष्ट्रामध्ये सध्या ईडीची कारवाई सुरू आहे, पण यामध्ये केंद्र सरकारचा व भाजपचा कोणताही हात नाही. ईडी स्वतंत्र संस्था आहे. आम्ही काही कोणाला कारवाई करा, असे सांगितले नाही. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. तुम्ही संपत्ती कमवा, त्याबद्दल कुणाचे दुमत नाही, पण ती कमावताना त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण वेळेवर देणे महत्त्वाचे आहे. नाहीतर ईडीची शिडी जेलमध्ये नेईल, हे लक्षात ठेवावे, असा इशाराही आठवले यांनी दिला.

प्रकाश आंबेडकरांची आवश्यकता नाही...
भाजपमध्ये प्रकाश आंबेडकर यांची काहीही आवश्यकता नाही, पण त्यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा एकही आमदार व खासदार निवडून आलेला नाही, त्यांनी फक्त मते खाण्याशिवाय काही केलेले नाही, त्यामुळे समाजाला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. समाजाला फायदा होण्यासाठी त्यांनी एनडीए मध्ये यावे, असे मी म्हणालो होतो, पण तशी त्यांची भाजपला काहीही गरज नाही, असे पुन्हा स्पष्ट करून आठवले म्हणाले, जेव्हा आम्ही सगळे एक होतो, त्यावेळेला चार खासदार तरी निवडून आले होते, पण आता त्यांचा एकही खासदार व आमदार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी सोबत यावे, असे मी म्हणालो, पण तशी भाजपला त्यांची काहीच गरज नाही, असेही पुन्हा आवर्जून आठवले यांनी सांगितले.

फक्त धर्मांतर नको
उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या लव्ह जिहाद कायद्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, 'कोणता कायदा करायचा, हा ज्या त्या राज्याचा अधिकार आहे. आंतरजातीय विवाह करण्यावर कोणतेही बंधन नाही. तसेच लव्ह जिहाद हा कायदा केवळ लग्नानंतर वधु वा वरापैकी कोणाचेही धर्मपरिवर्तन होऊ नये, असेच सांगणारा आहे, असा दावाही त्यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post