जरे हत्याकांड : चळवळीतील कर्तीधर्ती माणसं गप्पगार का?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''नगर जिल्ह्यात एका महिला कार्यकर्त्यांचा कट कारस्थान रचून निर्घृण खून होतो आणि अचानक सर्व चळवळीतील कर्तीधर्ती माणसं गप्पगार होतात, यामागे हेतु काय?'', असा सवाल येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुरेश लगड यांनी केला आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याची संपत्ती जप्त करून या गुन्ह्यातील आरोपींना फाशी-जन्मठेप शिक्षा देण्याची मागणी अॅड. लगड यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी आणखी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन, रेखा जरे हत्याकांड प्रकरणी संपूर्ण नगर जिल्हा गप्प का आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, नगरमधील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांना सहा आरोपी निष्पन्न झाले. पैकी पाच आरोपींना अटक केली. मात्र, सहावा आरोपी बाळ ज. बोठे हा या गुन्हयात मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एका महिलेचा खून होतो, पण त्याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. नगर जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून स्वातंत्र्योत्तर काळापासून ओळखला जातो. अनेक चळवळींचे उगमस्थान म्हणून याच जिल्हयाला ओळखले जाते. कामगारांचे आंदोलन असो, शेतकऱ्यांचे आंदोलन असो... जिल्हयाच्या या चळवळींची देशभरात 'नगरी पॅटर्न' म्हणून अनोखी ओळख आहे. परंतू याच जिल्हयाला कुणाची नजर लागली की काय? एरवी साधी टाचणी जरी पडली तरी संपूर्ण जिल्हा आंदोलनाने दणाणून सोडणाऱ्या संघटना, पक्ष, कार्यकर्ते, पुढारी कुठे अचानक गायब झाले, याचे उत्तर मात्र अनाकलनीय आहे,' असे स्पष्ट करून त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बोठे गेले ३-४ आठवड्यापासून फरार आहे. एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे त्याला शोधणे पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. खुनासारख्या गुन्हयातील फरारी आरोपी बोठे हा कार्यक्षम अशा पोलिस दलास सापडत नाही, यामागे अशी कोणती राजकीय शक्ती उभी आहे का? आता याचाही पोलिसांनी शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतू माझी अशी खात्री आहे की, हा मुख्य सुत्रधार नक्कीच पोलिसांच्या हाती लागेल. मुख्य सुत्रधाराचा मित्र डॉ. निलेश शेळके यास मोठया शिताफीने ताब्यात घेतल्याने त्याच्याकडून या मास्टरमाईंड फरार आरोपीची माहिती मिळू शकते. एक सामाजिक भावनेतून मी हा प्रश्न विचारीत आहे, असे ॲड. लगड यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post